“गणपतीनं अमित शाहांना सद्बुद्धी द्यावी” देशातील संपत्ती विकण्यावरून नाना पटोलेंची खोचक टीका, म्हणाले…

Maharashtra State

रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसकडून आयोजित केलेल्या ‘महागाईविरोधातील हल्लाबोल’कार्यक्रमातून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्रात भाजपप्रणित मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशात द्वेष वाढू लागला आहे. वाढती महागाई आणि बेरोजगारीमुळे लोकांना भवितव्याची चिंता आणि भीती वाटू लागली आहे. त्यातून द्वेष वाढतो, समाजात दुही वाढते. त्यास भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खतपाणी घालत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर टीकास्र सोडलं आहे. अमित शाह मुंबईत गणपतीच्या दर्शनासाठी आले आहेत, गणपतीने त्यांना सद्बुद्धी द्यावी. अमित शाहांनी देशासाठी काम करावं, देश विकण्यासाठी नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. ते सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले की, “जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजपाची रणनीती ठरते. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले आहेत. सध्या देशाच्या सीमा सुरक्षित नाहीयेत, अरुणाचल प्रदेशात चीनने अतिक्रमण केलं आहे. लडाखमध्येही अतिक्रमण केलं आहे. ज्याप्रकारे चीन दररोज आपल्या देशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत देशाच्या गृहमंत्र्यांची भूमिका काय असावी? हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे.”पुढे त्यांनी म्हटलं की, “देश सुरक्षित ठेवण्यासाठी लोकांनी त्यांच्या हाती सत्ता दिली होती. देश असुरक्षित आहे, असं तेच म्हणाले होते. सध्या काश्मीरी पंडितांचा मुद्दा गंभीर आहे. मागील कित्येक वर्षांपासून जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या नाहीत. काँग्रेसच्या काळात जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची वेळ यायची, तेव्हा हीच भाजपा घसा फाडून ओरडायची. याचा एकंदरीत अर्थ एवढाच आहे की, आरोप करणं सोपं असतं. पण देश चालवणं कठीण आहे. हे भाजपाला कळून चुकलंय.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *