राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ला अस्खलित मराठी बोलणाऱ्या ‘बिहारी’ पाहुण्याने दिली भेट; नव्या राजकीय समिकरणांच्या नांदीची चर्चा

Maharashtra State

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. अगदी काल त्यांनी घेतलेलं लालबागच्या राजाचं दर्शन असो किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन घेतलेलं गणपती दर्शन असो. गणेशोत्सवाशिवाय मागील काही दिवसांपासून भाजपा नेत्यांसोबत राज ठाकरेंच्या सुरु असणाऱ्या भेटीगाठीही राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यातच आज एक विशेष पाहुण्याने राज ठाकरेंच्या दादरमधील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी हजेरी लावली.

बिहार विधान परिषदेचे नवनियुक्त सभापती देवेशचंद्र ठाकूर यांनी मनसे अध्यक्षांची भेट घेतली. यावेळी राज आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन ठाकूर यांचं स्वागत केलं. राज यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर भूमीपुत्रांच्या रोजगाराच्या मुद्द्यावरुन उत्तर प्रदेश आणि बिहारमधून येणाऱ्या परप्रांतियांना विरोध केला होता. राज यांचा परप्रातिंयांविरोधातील लढा चांगलाच चर्चेत ठरला होता. या लढ्यावरुनच काही महिन्यांपूर्वी राज यांच्या अयोध्या दौऱ्यालाही भाजपाचे उत्तर प्रदेश खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. याच पार्श्वभूमीवर राज यांनी आता उत्तर भारतीयांबद्दल सौम्य भूमिका घेतल्याचं अधोरेखित करण्याच्या उद्देशाने ठाकूर यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.कोण आहेत ठाकूर?
बिहार विधान परिषदेच्या सभापतीपदी नुकतीच निवड झालेले देवेशचंद्र ठाकूर हे अस्खलित मराठी बोलणारे आहेत. अनेक वर्षे मुंबईत वास्तव्य तसेच पुणे आणि नाशिकमध्ये शिक्षण झालेले ठाकूर मूळचे बिहारी असले तरी त्यांच्यावर मराठीचा पगडा आहे.

मुंबई, पुणे, नाशिक कनेक्शन…
बिहार विधान परिषदेच्या गेल्याच आठवड्यात झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी जनता दलाचे (यू) देवेशचंद्र ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली. ठाकूर गेली २० वर्षे बिहार विधान परिषदेचे आमदार आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांच्यावर ही मोठी जाबदारी सोपविली आहे.
देवेश ठाकूर यांचा जन्म बिहारमधील सीतामढी व शालेय शिक्षण हजारीबागमध्ये झाले. पुढे नाशिकच्या सैनिकी शाळेत त्यांनी प्रवेश घेतला होता. पदवीपर्यंतचे शिक्षण हे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून झाले. कायद्याची पदवी त्यांनी पुण्याच्याच प्रसिद्ध ‘आयएलएस’ महाविद्यालयातून घेतली होती. पुण्यात शिक्षण घेत असताना त्यांनी पुणे विद्यापीठाची निवडणूकही लढविली होती. पुण्यात शिक्षण घेत असतानाच त्यांची माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी मैत्री झाली.

विलासरावांच्या काळात दबदबा
राज्याच्या राजकारणात पद भूषविण्याची त्यांची इच्छा काही पूर्ण झाली नाही. १९९०च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवार म्हणून बिहारमधून निवडणूक लढविली पण त्यात त्यांचा पराभव झाला. विलासरावांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मंत्रालयात देवेश ठाकूर यांचा चांगलाच दबदबा होता. राज्याच्या राजकीय वर्तुळात तसेच मंत्रालयात ठाकूर हे विलासरावांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात असत. मुंबईत त्यांचे वास्तव्य कुलाब्यात आहे. प्रदेश युवक काँग्रेसचे ते काही वर्षे उपाध्यक्ष होते. राजकीय महत्त्वाकांक्षा राज्यात पूर्ण होत नसल्याने ठाकूर यांनी बिहार गाठले.

मनसेची हिंदी भाषिकांबद्दल मवाळ भूमिका
बिहारच्या विधान परिषदेच्या अध्यक्षांना भेटून हिंदी भाषिकांसंदर्भातील आपल्या भूमिकेवरुन होणारा विरोध सौम्य करण्याचा राज यांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. एकीकडे भाजपा नेत्यांसोबत सुरु असणाऱ्या बैठकींच्या पार्श्वभूमीवर भाजपा-मनसे युतीची चर्चा सुरु असतानाच भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच हिंदी भाषिकांसंदर्भातील मनसेच्या भूमिकेसोबत भाजपा सहमत नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळेच आता हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारल्यानंतर हिंदी भाषिकांविरोधातील भूमिकेबद्दल मसनेची भूमिका मवाळ होणार का यासंदर्भात चर्चा सुरु आहेत. राज आणि ठाकूर यांची भेट ही नव्या राजकीय समिकरणांच्या नांदीची चर्चा अधिक बळकट करणारी असल्याचं मानलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *