दिल्ली : आईची हत्या करून काही दिवसांनी २५ वर्षींय मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीतील रोहिणीमध्ये ही घटना घडली आहे. क्षितिज असे आत्महत्या केलेल्या मुलाचे तर मिथिलेश असे हत्या करण्यात आलेल्या आईचे नाव आहे. मिथिलेश या विधवा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारील घरातून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी रविवारी ( ४ सप्टेंबर ) रात्री आठच्या सुमारास पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मग पोलीस कर्मचाऱ्यांनी बाल्कनीतून घरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक मुलाचा मृतदेह आढळला. तर, एका महिलेचा मृतदेह वॉशरुममध्ये अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मिळाला.याप्रकरणी पोलीस उपायुक्त प्रणव तायल यांनी सांगितलं, घटनास्थळी आम्हाला क्षितिजने लिहलेली सुमारे ७७ पानांची सुसाईड नोट सापडली आहे. त्यामध्ये क्षितिजने गुरुवारी आपल्या आईची हत्याच केल्याचं लिहलं आहे. नंतर क्षितिजने रविवारी स्वत:चा गळा चिरुन आत्महत्या केली आहे. क्षितिज हा बेरोजगार असल्याने मानसिक तणावाखाली होता. पोलीस अधिक तपास करत आहे, असेही प्रणव तायल यांनी म्हटलं. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिलं आहे.