मागील सीटवरील प्रवाशांनी सीट बेल्ट न लावण्याच्या मुद्द्यावरुन गडकरी संतापून म्हणाले, “सामान्यांचं राहू द्या मुख्यमंत्रीही…”

देश – विदेश

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्यानंतर कार आणि रस्ता सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मागील सीटवर बसलेल्या सायरस मिस्त्री यांनी सीट बेल्ट लावला नव्हता असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. यादरम्यान, आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील सीट बेल्टचा मुद्दा उपस्थित केला असून, जोपर्यंत लोक सहकार्य करत नाहीत तोपर्यंत रस्ते अपघात रोखण्यासाठीचे प्रयत्न व्यर्थ आहेत असं सांगत खंत व्यक्त केली आहे. सायरस मिस्त्री यांच्या निधनावर यावेळी त्यांनी शोकही व्यक्त केला.

गडकरी काय म्हणाले आहेत –
आयएएच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सायरस मिस्त्री यांच्या अपघाताचा उल्लेख करत नितीन गडकरींना कार आणि रस्ते सुरक्षेसंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं “सायरस मिस्त्री माझे फार चांगले मित्र होते. जे काही झालं ते दुर्दैवी आहे. आपल्या देशात प्रत्येक वर्षी पाच लाख अपघात होतात, त्यात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. नियमांचं पालन होण्यासाठी आम्हाला सहकार्याची गरज आहे”.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं “मागील सीटवर बसलेल्यांनी सीट बेल्ट लावण्याची गरज नाही असं लोकांना वाटतं. मला कोणत्याही अपघातावर भाष्य करायचं नाही, पण चारचाकीत प्रवास करताना फक्त पुढे बसलेल्यांनीच सीट बेल्ट लावायचा असतो अशी लोकांची समजूत आहे. पुढे आणि मागे बसलेल्या सर्वांनी सीट बेल्ट लावला पाहिजे”.

काही मुख्यमंत्रीही वाहन सुरक्षेच्या नियमांचं पालन करत नाहीत असंही गडकरी यावेळी म्हणाले. त्यांनी सांगितलं “सर्वसामान्यांचं सोडून द्या. मी चार मुख्यमंत्र्यांच्या कारमधून प्रवास केला आहे, फक्त त्यांची नावं विचारु नका. जर तुम्ही सीट बेल्ट लावला नसेल तर अलार्म वाजतो. पण चालकांनी हे अलार्म बंद करण्यासाठी क्लिप बसवली आहे. आपल्याला इथे सहकार्याची अपेक्षा आहे. जर चार मुख्यमंत्र्यांच्या कारमध्ये मी ही गोष्ट पाहिली आहे, तर हे थांबवण्यासाठी माझा प्रयत्न आहे”.

आपलं मंत्रालय वाहनात सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा विचार करत असल्याची माहिती गडकरींनी दिली. भारतीय कार उत्पादक यामुळे स्वस्त वाहनांची किंमत वाढेल आणि विक्री कमी होईल असा दावा करत असल्यासंबंधी बोलताना ते म्हणाले “परदेशात याचं पालन होतं. आपल्याकडे गरिबाच्या जीवाची काही किंमत नाही का?”. एका एअरबॅगसाठी ९०० रुपये अतिरिक्त भरावे लागतील अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *