अमोल कोल्हेंच्या ‘शिवप्रताप-गरुडझेप’मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता

Entertainment

सध्या मराठीत एकामागून एक ऐतिहासिक चित्रपटांची घोषणा होत आहे. तर अनेक चित्रपट प्रदर्शितही झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचा ऐतिहासिक चित्रपटांकडे पाहण्याचा ओढा देखील वाढला आहे. त्यातच आता अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे नवा ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत. ‘शिवप्रताप-गरुडझेप’ असं या चित्रपटाचं नाव आहे. ‘आग्र्याहून सुटका’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतला अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग यात दाखवला जाणार आहे. या चित्रपटात मोगल बादशाह औरंगजेब याची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. नुकतंच याचे उत्तर समोर आलं आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘शिवप्रताप- गरुडझेप’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या अनेक नाटयमय घडामोडींपैकी ‘आग्र्याहून सुटका’हा महत्त्वपूर्ण कालखंड पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रापासून दूर उत्तरेत आणि तेही औरंगजेबाच्या अमलाखालील प्रदेशात जाऊन सहीसलामत परत येणं ही अशक्यप्राय वाटणारी कामगिरी महाराजांनी कशी फत्ते केली हे या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. आग्रा मोहिमेचा हा रोमांचकारी इतिहास ५ ऑक्टोबरला रुपेरी पडदयावर झळकण्यास सज्ज झाला आहे. त्यातच आता या चित्रपटात गुलदस्त्यात असलेल्या कलाकारांच्या नावाचा उलगडा होण्यात सुरुवात झाली आहे.मोगल बादशाहांमध्ये औरंगजेब असा एकमेव शासक होऊन गेला आहे, ज्याने आपल्या चातुर्यपूर्ण रणनीतीने मोगल साम्राज्याचा विस्तार केला होता. इतिहासातला सर्वात क्रूर कपटी, जुलमी, धर्मांध बादशाहा अशी त्याची ओळख सांगितली जाते. ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटात औरंगजेबाची भूमिका कोण साकारणार? याची उत्सुकता चित्रपटाच्या घोषणेपासून शिगेला पोहोचली होती. त्याचं उत्तर आता मिळालं असून ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर ही भूमिका साकारणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *