नवी दिल्ली: देशभरात आज आयकर विभागाने अनेक ठिकाणी धाडी टाकल्या. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मुंबई, छत्तीसगड, उत्तराखंड, बंगळुरुमधील आयटी पथकांनी अनेक बड्या उद्योग समूहांवर छापे टाकले आहेत. करचोरी आणि राजकीय फंडिंगमुळे हे व्यावसायिक आयटीच्या रडारवर होते. त्यानंतर बुधवारी सकाळी या टीमने वेगवेगळ्या राज्यांमध्ये ५३ ठिकाणी छापे टाकले. छाप्यात आयकर विभागाने तब्बल १०० वाहनं वापरली. राजस्थानमधील मिड-डे मील घोटाळ्याबाबत आयटीने मुंबई, राजस्थान, उत्तराखंड आणि दिल्लीतही छापे टाकले आहेत. बंगळुरुच्या मणिपाल ग्रुपवरही आयटीची धाड पडली. तर राजस्थानच्या जयपूरमध्ये मिड-डे मील मधून कमाई करणाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत.