ऐन करोना संसर्गाच्या काळात तीन कृषी कायद्यावरून देशातील राजकीय वातावरण तापलं होतं. हे तिन्ही कायदे केंद्र सरकारने मागे घेतल्यानंतर दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्र सोडलं आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडणार आहे, याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशातील विविध समस्यांवर चर्चा घडवून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
करोना काळात राष्ट्रीय अधिवेशन घेता आलं नाही, पण उद्यापासून (रविवार) या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेससह सर्वांना आमंत्रित करण्यात आलं आहे. ज्यांना यामध्ये सहभाग घ्यायचा आहे, त्यांना देशातील विविध समस्यांवर बोलण्याची संधी मिळणार आहे, असंही पवार म्हणाले.