“…अन् पोलीस अधिकारीही भयभयीत झाले

Maharashtra State

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली होती. या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं आहे. शनिवारी मध्यरात्री दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा झाला. या प्रकारानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दादर पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना नेते सुनील शिंदे यांनी केला आहे. हा गोळीबार झाल्यानंतर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारीदेखील भयभयीत झाले होते, अशी प्रतिक्रिया सुनील शिंदे यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संबंधित प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुनील शिंदे म्हणाले की, “इकडचे जे स्थानिक आमदार आहेत, त्यांनी काही पदाधिकाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला. त्यानंतर पोलीस ठाण्यात येऊन पोलीस अधिकाऱ्यांसमोरच गोळीबार केला. तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही, हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. मी स्वत: रात्री पोलीस ठाण्यात आलो होतो. मी त्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं घेत नाही, परंतु घडलेल्या प्रकारानंतर पोलीस अधिकारीसुद्धा काळजीत होते, ते भयभयीत झाले होते, असा प्रकार यापूर्वी आम्ही कधीही बघितला नव्हता.”दहाव्या दिवशी मिरवणुकीदरम्यान प्रभादेवीमध्ये शिंदे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्ही बाजूंनी बाचाबाची झाली. त्यात सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी ‘म्याँव म्याँव’ म्हणत शिवसेनेवर टीका करणारं भाषण केल्यानंतर वातावरण अधिकच तापलं होतं. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद अधिक न चिघळता मिटला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी रात्री पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला. सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी केला. मात्र, हा कौटुंबिक वाद होता, असं म्हणत सदा सरवणकर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *