काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान खासदार राहुल गांधी यांनी घातलेल्या टी शर्टच्या किमतीवरुन भाजपाकडून जोरदार टीका करण्यात आली होती. या टीकेवर पलटवार करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाचा चांगलाच समाचार घेतला आहे. “चीनची चमचेगिरी करणारे जे लोक देशात सत्तेत बसले आहेत, त्यांना राहुल गांधींच्या टी शर्टवरुन मिरची का झोंबली?” असा खोचक सवाल पटोले यांनी केला आहे.चीनने भारताच्या अरुणाचल प्रदेश, लेह-लदाखच्या काही भागावर ताबा मिळवल्याचा आरोप राहुल गांधी सातत्याने करत आहेत. त्यावर केंद्र सरकार एक शब्ददेखील बोलायला तयार नाहीत, असे राजापुरात माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तिखट शब्दात टीका केली आहे. “अमित शाहांनी फालतू उपद्वाप बंद करावेत. त्याऐवजी त्यांनी देशाची सीमा सुरक्षा, महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या समस्यांवर बोलावे”, असा सल्ला पटोले यांनी शाह यांना दिला आहे. दरम्यान, भाजपा राहुल गांधी यांच्या पदयात्रेला घाबरली असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान घातलेल्या टी शर्टबाबत भाजपाने ट्वीट केले होते. राहुल गांधी यांनी ब्रिटिश कंपनीच्या ब्रँडचा बर्बेरी हा पांढरा टी-शर्ट घातला होता. त्याची किंमत ४१ हजार २५७ रुपये असल्याचे भाजपाने ट्वीटमध्ये म्हटले होते. ‘भारत देखो’ असे कॅप्शनही त्यावर लिहले होते. या ट्वीटनंतर राहुल गांधी परिधान करत असलेल्या कपड्यांच्या किमतीबाबत बरीच चर्चा रंगली आहे.