
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाकडून सेवा पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदींच्या वाढदिवसापासून महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत हा ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा’ साजरा केला जाणार आहे. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७२ वा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवा पंधरवाड्याबाबत माहिती दिली आहे. तर, भाजपाच्या या सेवा पंधरावाड्यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीका केली आहे.
“सेवाच करायची तर गांधी सप्ताह संयुक्तिक असता. वाढदिवस साजरा करण्यासाठी ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ नावाने गांधींशी संबंध जोडणे म्हणजे महात्म्याचे कार्य कमी लेखणे होय!. गांधीजींचे विचार व कार्य विरुद्ध टोकाचे होते. त्यापेक्षा राज्य सरकारने सत्ता पंधरवडा नाव द्यावे.” असं सचिन सावंत ट्वीटद्वारे म्हणाले आहेत.याशिवाय, “१७ सप्टेंबर पासून मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. वाढदिवसाच्या जल्लोषात राज्य सरकारला याचा विसर पडणे यापेक्षा मराठवाड्यावर मोठा अन्याय असू शकत नाही. मराठवाडा मुक्तीसाठी झालेला संघर्ष व त्याग आठवणे, मराठवाड्याच्या प्रगतीचा निग्रह या वर्षात अभिप्रेत आहे.” असं देखील सचिन सावंत यांनी म्हटलेलं आहे.