प्रा. प्रशांत पळसपगार
उप संपादक सिटी न्यूज सुपरफास्ट
राजकारण हे जनहितार्थ आणि व्यक्तीकेंद्रीत असायला पाहिजे परंतु गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे गढूळ झाल्याचे दिसत आहे, वर्चस्वाच्या लढाईमध्ये आणि सत्ता स्थापन करण्याच्या धुंदीमध्ये संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राची राजकीय सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळालेली आहे. महाराष्ट्राकडे पाहण्याचा आज दृष्टीकोण संपूर्ण जगात बदलत आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचे महानाट्य गेल्या काही महिन्यापासून केवळ महाराष्ट्रातील जनताच नव्हे तर साऱ्या जगातील प्रत्येक व्यक्ती पाहत असल्याचे दिसत आहे महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुरघोडी केली जात असल्याचे दिसले. दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी महाविकासआघाडी सरकारने अटीतटीवर पार केला मात्र सूडबुद्धीने विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांच्या मागे लागल्याने विकासाचे धोरण बाजूला राहून गेले. या मध्ये बराच वेळ काहींचा सत्ता टिकवण्यात तर काहींचा सत्ता उध्वस्त करण्यात गेला. गेल्या दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण जनता आर्थिक दृष्ट्या निकामी झाली आहे दुसरीकडे आपला प्रपंच कसा वाचवायचा या समस्या मध्ये गुंतलेल्या महाराष्ट्रातील नागरिक विकासाच्या मुद्द्यापासून खूप दूर नेऊन ठेवला.
आज जवळजवळ एक दशक पूर्ण होत आले राज्यात कुठल्याच प्रकारचा रोजगार वाढल्याचा किंवा रोजगाराची संधी प्राप्त करून देण्याचा शासनामार्फत कोणताच पवित्रा हाती घेतल्याचे दिसत नाही, केवळ एकमेकांचे दोषारोपण करून स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यात महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय नेता भिडलेला दिसत आहे, चालू पंचवार्षिक योजनेत शासकीय नव्हे तर खाजगी नोकरी मिळणे देखील कठीण झाले आहे. अनेक महिने चाललेल्या राजकीय महानाट्य नंतर राज्यात बीजेपी आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले काहीतरी करून दाखवण्याच्या आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ दर्शविण्याच्या विचारधारेतून शिंदे सरकार ने सामान्य नागरीक केंद्रबिंदू ठेवून सुशासन नियमावली तयार करण्याबाबत सूचना देखील दिल्या. आणि त्या दिशेने पाऊले देखील उचलली मात्र हि खेळी म्हणजे जुन्या बॉटल मध्ये नवीन दारू भरण्यासारखे आहे असे म्हटल्यास चुकणार नाही. आज बीजेपी च्या हातातील खेळणे बनलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी संपूर्ण राज्यात हिंदू गर्व गर्जना यात्रा काढणार असल्याची माहिती समोर आली आहे हे यात्रा 20 सप्टेंबर पासून सुरू होणार असून 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे आहे, ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला जाणार तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे संवाद आणि निष्ठा यात्रेचा पाचवा टप्पा १६ सप्टेंबर २०२२ ला सुरू होणार आहे आदित्य ठाकरे यांनी सुरू केलेल्या यात्रेला प्रतिउत्तर देण्यासाठी शिंदे यांनी आपल्या गटातील महाराष्ट्रातील प्रत्येक आमदाराला जबाबदारी देऊन आपले समर्थन वाढवण्याचा यातून प्रयत्न केला जात असल्याचे समोर आले आहे. या यात्रेमध्ये महाराष्ट्रातील जनता पेटून उठावी म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य ‘गर्व से कहो हम हिंदू है ‘ याचा ब्रीद वाक्य म्हणून उपयोग देखील केला जात आहे हा प्रकार म्हणजे जनतेच्या भावनेशी खेळण्याचा आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय पक्ष केवळ आपली प्रबळता दर्शविण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करत आहे. केवळ भावनिक मुद्द्यांना टार्गेट करून महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकांच्या भावनेशी येथे खेळल्या जात असल्याचे दिसत आहे दररोज महाराष्ट्र मध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आत्महत्या होत आहे आर्थिक परिस्थिती ढासळत चालली आहे नोकरीचे प्रमाण कमी झाले आहे बेरोजगार वाढलेला आहे अशा परिस्थितीमध्ये हिंदू गर्व गर्जना यात्रा कोणाचे पोट भरण्याचे साधन होऊ शकत नाही. याची महाराष्ट्रातील जनतेने दखल घ्यायला पाहिजे आणि चालू असलेले राजकीय महानाट्य थांबवायला पाहिजे. नाहीतर एकदिवस असा येणार कि हेच लोक महाराष्ट्र विकायला निघणार आहे.
देशात आणि महाराष्ट्र मध्ये बीजेपी शासन आले तेव्हापासून महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचे वाटोळे होत असल्याचे जनता पाहत आहे याला कोणीच नाकारू शकत नाही आज महाराष्ट्रातून अनेक मोठे उद्योजक गुंतवणूकदार महाराष्ट्र बाहेर गुंतवणुक करत असल्याचे दिसते महाराष्ट्रातून हेतूपुरस्सर उद्योगधंदे बाहेर घेऊन जात असल्याचे दिसत आहे अशा राजकारणाचा महाराष्ट्रामध्ये काय फायदा असा जनतेने प्रश्न विचारायला पाहिजे.
आज पुन्हा महाराष्ट्रात आर्थिक भूकंप झाल्याचे दिसत आहे. ज्या मध्ये राज्यातील बहुचर्चित वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प हा गुजरातमध्ये जाणार असल्याची चाहुल लागताच महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे नेते आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले जात आहे.खरोखर या सरकार राज्याच्या विकासाबद्दल किती जागृत आहे हे आता सर्वांना कळत आहे. खरं तर या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात दोन लाख कोटींची गुंतवणूक होणार होती. आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याच्या हालचाली झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. या विषयाची सखोल तपासणी व्हायला पाहिजे अशा प्रतिक्रिया समाज माध्यमावर उमटत आहे. प्रत्यकाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं. महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प महाराष्ट्रात कायम राहावा या करिता गेल्या वर्षभरापासून अनेक बैठका आयोजित केल्या, संबंधितांशी भेटीगाठी करून पुण्याजवळील तळेगाव येथे हा प्रकल्प निश्चित करण्यात आला, केवळ कागदोपत्री व्यवहार बाकी होता, मात्र माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक आणि संपूर्ण राज्यात हिंदू गर्व गर्जना यात्रा काढणाऱ्या या शिंदे फडणवीस सरकारने वेळेचाही विलंब न करता हा प्रकल्प गुजरात ला रवाना केला. काही परप्रांतीयांनी निवडणूक पूर्व काळात महाराष्टामध्ये होणार तेव्हढा असंतोष आणि बुद्धिभेद निर्माण करून महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक प्रतिमा मालिन करून मोठे गुंतवणूकदार या राज्यात येणार नाहीत याची काळजी घेतली आहे. असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. करोनाकाळात सरकारकडून आर्थिक मदत द्यावी लागलेल्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांतील प्रत्येकी सहापैकी एकाचे कर्ज बुडीत खाती गेले आहे. अशी आर्थिक रसद द्यावी लागलेल्या ९८ लाख उद्योगांतील १६ लाखांहून अधिक उद्योग आज बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. एक उद्योग राज्यातून बाहेर गेल्याने रोजगारावर काय परिणाम होऊ शकतो किंवा राज्याची आर्थिक स्थितीमध्ये काय फरक पडू शकतो याची जाणीव शिंदे फडणवीस सरकारला अजिबात नसल्याचे कळते. याचे आत्मपरीक्षण महाराष्ट्रातील जनतेने करणे आज गरजेचे आहे. वेळीच राजकीय मनसुबे समजून घेऊन योग्य ते पाऊल उचलणे गरजेचे आहे.