ठाणे : फाॅक्सकाॅन पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचे मोदींचे आश्वासन ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

Maharashtra State

राज्यात एखादा उद्योग आणायचा असेल तर, त्यासाठी उच्च अधिकार समितीची बैठक घेऊन त्यात मान्यता घ्यावी लागते. ‘फाॅक्सकाॅन’च्या प्रकल्पासाठी महाविकास आघाडीने अशी कोणतीही बैठक घेतलेली नव्हती. शिंदे आणि फडणवीस सरकारने सत्तेवर येताच अशी बैठक घेऊन कंपनीला भरीव पॅकेज देण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली असून त्यादरम्यान मोदी यांनी ‘फाॅक्सकाॅन’ पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार असल्याचे सांगितले आहे, असा दावाही मंत्री सामंत यांनी केला आहे.‘वेदांत समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आता गुजरातकडे वळली असून याच मुद्द्यावरून शिंदे आणि फडणवीस सरकारवर विरोधकांकडून टिका होऊ लागली आहे. या टिकेला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. विरोधकांच्या टिकेला उत्तर द्यायचे नाही पण, सत्यस्थिती मांडून जनतेत पसरलेला गैरसमज दूर व्हावा यासाठी पत्रकार परिषद आयोजित केल्याचे सामंत यांनी म्हटले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योग विभागाचे जे मंत्री होते, त्यांनी ७ जानेवारी २०२० मध्ये ही कंपनी महाराष्ट्रात येऊ शकत नाही, असे म्हटले होते. तसेच ही कंपनी महाराष्ट्रात येणारच नाही, हे ठरवूनच ते कामाला लागले होते. त्यामुळे आता कंपनी दुसरीकडे गेली तर गवगवा कशासाठी करत आहेत, असे सांगत सामंत यांनी सुभाष देसाईंवर टिका केली. ‘फाॅक्सकाॅन’च्या प्रकल्प महाराष्ट्रात यावा म्हणून भेटीगाठी घेतल्याचे दावे केले जात आहेत. परंतु राज्यात एखादा उद्योग आणायचा असेल तर, त्यासाठी उच्च अधिकार समितीची बैठक घेऊन त्यात मान्यता घ्यावी लागते. ‘फाॅक्सकाॅन’च्या प्रकल्पासाठी महाविकास आघाडीने अशी कोणतीही बैठक घेतलेली नव्हती. शिंदे आणि फडणवीस सरकारने सत्तेवर येताच अशी बैठक घेऊन कंपनीला भरीव पॅकेज देण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा सामंत यांनी यावेळी केला. महाविकास आघाडीने सहा महिन्यांपुर्वीच उच्च अधिकार समितीची बैठक घेऊन निर्णय घेतला असता तर, ही वेळ आली नसती. हा प्रकल्प गुजरातला गेल्याचे दुख आम्हालाही आहे. पण, त्याचे राजकारण करू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली असून त्यादरम्यान मोदी यांनी ‘फाॅक्सकाॅन’ पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार असल्याचे आश्वस्त केले आहे, असा दावा करत मोदी दिलेला शब्द पाळता, हे सर्वांना माहिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा झाली असून रत्नागिरी, भिवंडी, जालना, पुणे याठिकाणी लाॅजेस्टीक पार्क तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेकांना या माध्यमातून नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *