मुबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन भाजपावर सडकून टीका केली आहे. भाजपा नेत्यांच्या आरोपांची आम्हाला सवय झाली आहे. भारतीय जनता पार्टी सध्या ‘भारतीय जनता लाँड्री’ झाल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. वेदान्त कंपनीकडे किती टक्के मागितले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. यावरुन सुळे यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे.
भाजपाने राज्यातील काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. या नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना क्लीनचीट देण्यात आल्याचा आरोप सुळे यांनी केला आहे. भाजपाने केलेले हे आरोप जर खोटे असतील तर त्यांनी नेत्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली पाहिजे, असे पुण्यात सुळे म्हणाल्या आहेत. या नेत्यांनी जर खरच गुन्हा केला असेल तर भाजपात येताच त्यांना क्लीनचीट कशी मिळाली, असा सवालही सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. या भूमिकेबाबत लवकरच भाजपाशी चर्चा करणार असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.
वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. “वेदान्त-फॉक्सकॉन चा दीड लाख कोटींचा प्रकल्प होता. मग इथे किती टक्के मागितले होते? १० टक्के नुसारच हिशोब मागितला जात होता की महापालिकेतील रेटने मागणी होत होती?”अशा आशयाचे ट्वीट भाजपा नेते आशिष शेलार यांनी केले होते. या ट्विटनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. या प्रकल्पासंदर्भातील आरोप धादांत खोटे असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा, यासाठी शिंदे सरकारने प्रयत्न केले नसल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.