नागपूर : गेल्या चार महिन्यांत घेतलेल्या सभा, ठाकरे सरकारवर ओढलेले आसूड, भाजपला अनुकूल घेतलेली भूमिका, ज्वलंत हिंदुत्वाचा मुद्दा तसेच शिवसेनेत पडलेली फूट, एकनाथ शिंदे यांचं बंड आणि मोठ्या नाट्यानंतर शिंदे-फडणवीसांचं विराजमान झालेलं सरकार, दरम्यान या काळात आजारपणावर केलेली मात, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. आज सकाळी साडे आठ वाजता राज ठाकरे यांचं नागपूरमध्ये आगमन झालं. यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. राज ठाकरेंच्या स्वागताला नागपूर रेल्वे स्टेशनला शेकडो पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. यावेळी ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचं स्वागत केलं गेलं. राज ठाकरेंनी शेकडो कार्यकर्त्यांना अभिवादन करुन त्यांचा मानपान स्वीकारला.
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन संघटनात्मक बांधणीसाठी राज ठाकरे सुमारे तीन वर्षांनंतर नागपूरला पोहोचले आहेत. मुंबईतून काल विदर्भ एक्स्प्रेसने निघालेले राज ठाकरे आज साडेआठ वाजेच्या सुमारास नागपुरात पोहोचले. मनसे कार्यकर्त्यांनी थाटामाटात राज ठाकरे यांचं स्वागत केलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. राज ठाकरेंना गर्दीतून वाट काढत रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडावं लागलं. पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली होती.
राज ठाकरे स्टेशनहून थेट हॉटेलवर पोहोचले. चहापान आवरुन त्यांनी विदर्भातील पहिल्या बैठकीचा श्रीगणेशा केला. आपल्याजवळ तीन महिन्यांचा कालावधी आहे. कामात मागे पडू नका, जोरदार काम करा, अशा सूचना त्यांनी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्याजवळ जे काही शिल्लक दिवस आहे, त्या दिवसांत प्रचंड काम करा. घराघरात पोहोचा. पक्षाची ध्येयधोरणे लोकांमध्ये पोहोचवा, आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल, अशा शब्दात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.