मुंबई: गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ देशात इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने घट सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खनिज तेल २५ ते ३० डॉलरनी स्वस्त झाले आहे. सध्या क्रूड ऑईल ९१ डॉलर प्रति-बॅरल दरावर ट्रेंड होत आहे. मात्र आपल्या देशात पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये कुठलीही घट झालेली नाही. २१ मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केल्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये अनुक्रमे ९.५० आणि ७ रुपयांनी घट झाली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल ९० डॉलरच्या आसपास असूनही, रविवारीही देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सारख्याच होत्या. कच्च्या तेलाच्या किमती जवळपास आठवडाभरापासून प्रति बॅरल ९० च्या आसपास आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर, आज लंडन ब्रेंट क्रूड प्रति बॅरल ९१.३५ प्रति डॉलर आणि यूएस क्रूड ०.३५ टक्क्यांनी वाढून ८५.४० प्रति बॅरल होते. या घटीच्या प्रमाणात तेल कंपन्यांनी दरात कपात केली तर पेट्रोल आणि डिझेलचे दर ११ ते १२ रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०६.३१ रुपये तर डिझेलचा दर ९४.३५ रुपये प्रतिलिटर आहे.मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि मालवाहतूक शुल्काच्या आधारावर देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात.
देशांतर्गत तेल विपणन कंपनी भारत पेट्रोलियमच्या म्हणण्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.