अकोला: शहराच्या कानाकोपऱ्यात भटक्या श्वानांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. लहान मुलांना चावा घेतल्याच्या घटना सातत्याने घडून येत आहेत. या पृष्ठभूमीवर महापालिका प्रशासनाने यापूर्वी नसबंदीसाठी केलेला कंत्राट रद्द करीत नवीन कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. आजवर शहरातील १० हजार २७२ भटक्या कुत्र्यांची नसबंदी केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी कुत्र्यांचा उच्छाद लक्षात घेता यापूर्वी करण्यात आलेला नसबंदीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. मोकाट कुत्र्यांचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर श्वानांच्या नसबंदीचा सर्वात पहिला प्रयाेग महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी केला हाेता.
२०१६ मध्ये त्यांनी पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून अत्यल्प दरात कुत्र्यांच्या नसबंदीला सुरुवात केली. यानंतर तत्कालीन आयुक्त निमा अरोरा यांनी नसबंदीसाठी सोसायटी फाॅर अनिमल प्राेटेक्शन या संस्थेची नियुक्ती केली. या संस्थेने सव्वा वर्षाच्या कालावधीत १० हजार पेक्षा अधिक श्वानांची नसबंदी केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. नसबंदीसाठी संस्थेला प्रति श्वान बाराशे रुपये अदा करण्यात आले. नसबंदी करण्यात आलेल्या श्वानांची संख्या लक्षात घेतल्यास मनपाला १ काेटी २३ लक्ष रुपये अदा करावे लागतील. तूर्तास मनपाने ९० लक्ष रुपयांचे देयक अदा केल्याची माहिती आहे.