नवनियुक्त कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी स्वीकारला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभार!
अकोला :- वैदर्भीय शेतकरी केंद्रबिंदू मानून सरळ- साधे -सोपे परिस्थितीजन्य कालसुसंगत व्यावसायिक शेती तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसारासह कृषी विद्यापीठ सर्वार्थाने स्वयंपूर्ण करण्याकडे आपला प्राधान्यक्रम असल्याचे सुतोवाच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे नवनियुक्त कुलगुरू डॉ.शरद गडाख यांनी केले. विद्यापीठाच्या अकोला मुख्यालय आज प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप मालखेडे यांचेकडून कुलगुरू पदाचा प्रभार स्वीकारल्यानंतर आयोजित अधिकारी वर्गाच्या सभेप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाराष्ट्रासह विदर्भातील एकंदरीत शेती व्यवसायाची जाण असल्याने व गत तीन दशकाहूनही अधिक काळ याच विषयात संशोधनासह सेवा देत असल्याने प्राप्त परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी करावयाच्या उपायोजना कृतीत आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा आत्मविश्वास डॉ. गडाख यांनी पुढे बोलतांना व्यक्त केला. विद्यापीठातील अत्यल्प मनुष्यबळ, कामगारांच्या समस्या, संशोधन केंद्रांचे प्रश्न सोडवण्यासह दर्जेदार कृषी शिक्षणाच्या पद्धती, स्पर्धात्मक परीक्षांसाठीची वातावरण निर्मिती, अधिकारी -कर्मचारी वर्गांचे सक्षमीकरण करण्यासह आत्मनिर्भर संशोधन केंद्र तथा कृषी विज्ञान केंद्र प्रणाली सह शैक्षणिक संस्थांचे जाळे संपूर्ण विदर्भ स्तरावर निर्माण करीत स्वयंपूर्ण विद्यापीठाचे स्वप्न साकार करण्याकडे सुद्धा भर देणार असल्याचे डॉ. गडाख यांनी पुढे बोलताना सांगितले.