नवी दिल्ली : ZEM Car Which Cleans Air and Absorbs Carbon : जगभरातले बरेच देश प्रदूषण कमी करण्यावर भर देत आहेत. प्रदूषण कमी व्हावं यासाठी पेट्रोल डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यासारखे प्रयोग केले जात आहेत. तसेच हवा शुद्ध करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत देखील घेतली जात आहे. दरम्यान नेदरलँडमधील एका युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी एक आगळी वेगळी कार बनवली आहे. ही कार बनवण्यापासून ते तिची खासियत अशा अनेक गोष्टींमुळे ही कार चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे. या कारची सर्वात मोठी खासियत म्हणजे ही कार भंगारातलं साहित्य वापरून बनवण्यात आली आहे.या कारला झेम कार असं नाव देण्यात आलं आहे. या कारमध्ये रिसायकल केलेलं प्लॅस्टिक देखील वापरण्यात आलं आहे. या कारची आणखी एक खासियत म्हणजे ही कार जेव्हा धावते तेव्हा प्रदूषण करत नाही, तसेच ही कार प्रदूषण देखील कमी करते.या कॉन्सेप्ट ईव्ही कारमध्ये 22 KwH क्षमतेची मोटर देण्यात आली आहे जी री-जनरेट ब्रेकिंगचा वापर करून उत्तम परफॉर्मन्स देते. या कारमध्ये क्लीनट्रॉम लिथियम आयन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. तसेच यामध्ये दोन फिल्टर लावण्यात आले आहेत जे २० हजार मैलांच्या प्रवासादरम्यान २ किलो कार्बन डायऑक्साईड शोषूण घेऊ शकतात. ही कार जिथे चालवली जाईल तिथल्या हवेतील कार्बन डायऑक्साईड ही कार शोषूण घेईल.आता जर कार बनवतानाच जर वेगळी पद्धत वापरली आहे तर ही गोष्टदेखील स्वाभाविक आहे की, कारचा लूक देखील वेगळा असेल. या कारला सुपर कारचा लूक देण्यात आला आहे.या कारला झेम (ZEM) असं नाव देण्यात आलं आहे. झेम म्हणजे झिरो एमिशन मोबिलिटी. मीडिया रिपोर्ट्सनुसार University Of Technology च्या विद्यार्थ्यांनी ही कार बनवली आहे. विद्यार्थ्यांनी अद्याप या कारचं पेटंट मिळवलेलं नाही. विद्यार्थ्यांना असं वाटतं की, एखाद्या मोठ्या वाहन निर्मात्या कंपनीने त्यांच्या कारपासून प्रेरणा घ्यावी आणि अजून उत्तमोत्तम कार बनवाव्यात. जेणेकरून आपलं भविष्य अजून चांगलं असेल.