मुंबई : मुंबईतील फिफा लोगो अनावरण सोहळ्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वेळेत न आल्यानं विरोधी पक्षनेते अजित पवार निघून गेल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकारांसोबत बोलताना सविस्तर माहिती दिली. तीन तास वाट पाहून अजित पवार निघून गेले होते. राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक अकरा वाजता होणार असल्यानं १२ वाजता दुसरा कार्यक्रम आयोजित करण्याची गरज नव्हती. कॅबिनेट बैठक एक तासात संपत नाही. मी तिथं साडे बारा ते तीन पर्यंत मी थांबलो होतो. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला शरद पवार यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती, तिकडे जाणं आवश्यक असल्यानं मी खेळाडूंना भेटलो शुभेच्छा दिल्या आणि निघालो, असं अजित पवार म्हणाले.
राज्याचे प्रमुख, उपप्रमुख यांचा वेळ महत्त्वाचा आहे हे माहिती आहे. महाराष्ट्राचं देशाचं नाव गाजवलेले खेळाडू तिथं येतात. त्यांना जादा वेळ थांबायला लावण बरोबर नाही. मी त्यांना भेटलो, असं अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीनंतर निघून गेल्याचं समजलं मात्र त्यांनी वेळेला महत्त्व दिलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.