झूलन गोस्वामी : ईडन गार्डन्सवरची बॉल गर्ल ते जगातील पहिल्या क्रमांकाची गोलंदाज बनण्याचा प्रवास..

Sport

‘चकदा एक्सप्रेस’ म्हणजेच भारताची दिग्गज क्रिकेट खेळाडू झूलन गोस्वामी. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर झूलन आज आपल्या कारकिर्दीचा शेवटचा क्रिकेट सामना खेळणार आहे.

या निमित्ताने दोन दशकांपासून सातत्याने वेगवान धावणारी ही एक्सप्रेस आता विश्रांती घेईल.

ईडन गार्डन्स. भारताची क्रिकेट पंढरी. 29 डिसेंबर 1997 रोजी या मैदानावर जोरदार उत्साह होता. महिला क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांदरम्यान त्यादिवशी खेळवला जात होता.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाची फलंदाज बेलिंडा क्लार्क चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत होती. याच सामन्यात सपोर्ट स्टाफमध्ये एक 15 वर्षीय भारतीय मुलगीही होती. बंगालच्या एका छोट्याशा गावातून ती बॉल गर्लचं काम करण्यासाठी याठिकाणी आली होती.

विश्वचषक स्पर्धेच्या त्या झगमगाटाने त्या मुलीच्या डोळ्यांतही एक स्वप्न जागवलं. एके दिवशी विश्वचषक स्पर्धा खेळण्याचं स्वप्न.

‘मी मैदानात वर्षांनुवर्षं घाम गाळलाय,’ म्हणत जेव्हा मितालीने ट्रोल्सला चूप केलं
मिताली राज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त; कसा होता भरतनाट्यमपासून क्रिकेटच्या मैदानापर्यंतचा प्रवास?
याच स्वप्नांच्या बळावर झुलन गोस्वामी नामक त्या मुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली.

आज 20 वर्षांच्या आपल्या लांबलचक कारकिर्दीतून झुलन निवृत्त होत आहे. महिला क्रिकेट विश्वातील सर्वश्रेष्ट क्रिकेटपटूंमध्ये झूलनचं नाव घेतलं जातं.

आपल्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी सांगताना झूलन म्हणते, “चकदा या बंगालच्या एका लहान गावात मी लहानाची मोठी झाले. घरच्या अंगणात सगळी मुले क्रिकेट खेळत असत. तिथे मी त्यांची बॉल गर्ल होते. अंगणाबाहेर चेंडू गेला की ते आणून द्यायचं माझं काम होतं. पण दुपारी सगळे झोपल्यानंतर मी एकटीच खेळत सराव करायचे.”

“मी दहा वर्षांची होते. मला अजूनही आठवतं, 1992 सालची पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरू होती. सचिन तेंडुलकरला टीव्हीवर खेळताना पाहणं अजूनपर्यंत आठवतं. सचिन-सचिनचा तो जयघोष जादुई होता. त्यावेळी विश्वचषकाच्या प्रसिद्धीसाठी ईट क्रिकेट, स्लीप क्रिकेट आणि ड्रीम क्रिकेट अशी एक जाहिरात यायची. आमच्या आयुष्यात तसंच काही झालं होतं.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *