मुंबई : राज्यसभेवर नुकतेच निवडून गेलेले शिवसेना नेते संजय राऊत यांची निवड रद्द करावी, अशी मागणी भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. भ्रष्ट पद्धतीने मतं मिळविल्याचा सोमय्या यांचा आरोप आहे. राऊत यांच्या विजयावर माझा आक्षेप असून त्यांची निवड रद्द करण्यात यावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.राज्यसभेच्या सहा जागांसाठी नुकतीच निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत भाजपचे तीन तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले. उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेनेकडून पहिल्यांदाच संजय राऊत यांनी राज्यसभेचा विजयी चौकार मारला. मात्र संजय राऊत यांनी भ्रष्ट पद्धतीने मते मिळवून निवडणूक जिंकल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
सोमय्या म्हणाले, “आज निवडणूक आयोगाकडे संजय राऊतांविरोधात तक्रार याचिका सूपूर्द केली. राऊतांनी आमदारांना धमक्या देणं, आमदारांनी कुठे मतं दिली आहेत, हे सांगून गुप्ततेचा भंग करणं, निवडणूक आयोगाला बदनाम करणं, प्रश्न असाय की अमुक ६ आमदारांनी आघाडीला मतदान केलं नाही हे संजय राऊतांना कळलं कसं? म्हणजेच मतमोजणीवेळी राऊतांनी आचारसंहितेचा भंग केलाय. म्हणून निवडणूक आयोगाने राऊतांविरोधात कारवाई करावी”