देहू (पुणे) : “देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीचे केंद्रच नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याचा मार्गही प्रशस्त करते. या पवित्र स्थानाची पुनर्बांधणी केल्याबद्दल मी मंदिर ट्रस्ट आणि सर्व भक्तांचे आभार मानतो. जगातील सर्वात जुन्या जिवंत संस्कृतींपैकी भारत एक असल्याचा आम्हाला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रनायकाच्या जीवनात तुकारामांसारख्या संतांचा फार मोलाचा वाटा आहे. वीर सावरकरांना स्वातंत्र्यलढ्यात शिक्षा झाली तेव्हा तुरुंगात ते तुकारामजींचे अभंग म्हणत,चिपळी सारखे हातकडी वाजवत”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आज देहूत शिळा मंदिराचं लोकार्पण झालं. संत तुकारामजांचा दयाळूपणा, करुणा आणि सेवेची जाणीव त्यांच्या ‘अभंगां’च्या रूपात अजूनही आहे, असं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केलं. तुकोबांच्या अभंगांनी आपल्या पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. जे नष्ट होत नाही, जे शाश्वत राहते आणि काळाबरोबर संबंधित असते, ते अखंड असते. तुकोबारायांचे अभंग हे शाश्वत आहेत, असं मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी म्हणाले, “मनुष्यजन्मात संतांचा सत्संग हा दुर्लभ असतो असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. संतांची कृपा झाली, तर भगवंताचा साक्षात्कार आपोआप होतो. आज देहू या पवित्र तीर्थक्षेत्री येताना मलाही असेच वाटत आहे. देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीचे केंद्रच नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याचा मार्गही प्रशस्त करते. या पवित्र स्थानाची पुनर्बांधणी केल्याबद्दल मी मंदिर ट्रस्ट आणि सर्व भक्तांचे आभार मानतो”.