अकोला – जिल्ह्यातील बाळापूर व अकोला तालुक्यात शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ८६४ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये कापुस, सोयाबीन व तुर पिकाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त अनेक जनावराचा सुद्धा पावसामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यातील अकोला व बाळापूर तालुक्यात शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नदी व नाल्यांना पूर आला व ते दुथडी भरून वाहू लागले. त्यामुळे नदी व नाल्याच्या काठी वस्ती असलेल्या घरांमध्ये पाणी शिरले तर नदी व नाल्यांचे पाणी शेतात सुद्धा शिरले. सदर पावसामुळे अकोला तालुक्यातील ८१४ व बाळापूर तालुक्यातील ५० हेक्टर असे एकूण ८६४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर पिकांचा समावेश आहे. रात्री दरम्यान पावसाने जोर पकडल्याने बाळापूर तालुक्यातील निंबा महसूल मंडळात अतिवृष्टी म्हणजेच ७६ मिमी पाऊस झाला, तर जिल्ह्यात १९.५ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाच्या वादळी स्थितीमुळे बाळापूर तालुक्यात एका बैलाचा मृत्यू झाला. याव्यतिरिक्त पावसामुळे बाळापूर तालुक्यातील सात व अकोला तालुक्यातील ४० घरांचे अंशतः नुकसान झाले. संबंधित नुकसानाचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला असून अंतिम सर्वेक्षण झाल्यानंतर संबंधितांना नुकसान भरपाई देण्यात येईल.