
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहेत. नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी स्वतः दिल्लीवरून हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्वतः पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची राहाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.तसेच, पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी एनडीआरएफ पथके पाठवण्याची सूचना केली. काही कमी जास्त लागल्यास स्वतः कळवावे असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.हिंगोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने संततधार बॅटिंग सुरु केली आहे. अनेक भागातील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. वसमत तालुक्यातल्या कुरुंदा परिसरात मध्यरात्री ४ ते ५ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाने झोडपलं आहे. ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने कुरुंदा गावातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल आहे. कुरुंदा गावातील अनेक नागरिकांनी घराच्या छतावर रात्र जागून काढली. आपला जीव मुठीत धरून हे नागरिक रात्रभर या धो – धो पावसात हलाकीच्या परिस्थितीचा सामना करत होते.आसना नदीला आलेल्या पुरामुळे गावात जवळपास ४ ते ५ फूट पाणी शिरलं होतं. गावात नदीकाठची काही घरं पाण्याखाली सुद्धा गेली होती. उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे अनेक घरांच्या भिंतीची पडझड झाली आहे. तसेच घरातील जीवनावश्यक वस्तूसह इतर साहित्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. सोबतच शेतातील पीकं सुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे.