गेले दोन दिवस एक व्हिडीओ वायरल होत आहे. समुद्राची लाट ही खडकांवर आदळते,लाटेचे पाणी परत समुद्रात वाहून जात असतांना या पाण्यात तीन जणं वाहून जातात असं या व्हिडीओत दिसते. वाहून गेलेल्या लोकांचे पुढे काय झाले, ते वाचले का अशा प्रतिक्रियाही या व्हिडीओच्या निमित्ताने व्यक्त झाल्या. तर हा वायरल व्हिडीओ ओमान देशातील असून या घटनेचा संबंध हा सांगलीशी आहे.या घटनेला शशिकांत म्हमाणे यांचे बंधू अॅड. राजकुमार म्हमाणे यांनी दुजोरा दिला आहे.मूळचे जत येथील शशिकांत म्हमाणे हे मागील अनेक वर्षांपासून दुबई येथील एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते. पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती व अन्य एक मुलगी (नाव समजू शकले नाही ) यांच्यासह दुबई येथे राहण्यास होते. बकरी ईदमुळे सुट्टी असल्याने मयत शशिकांत, पत्नी, मुले व मित्रांसह दुबई जवळ असलेल्या ओमान या देशात फिरायला गेले होते. त्यावेळी ही घटना घडली आहे.सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील तिघेजण ओमान देशात समुद्राच्या लाटेत वाहून गेल्याची दुर्देवी घटना रविवारी १२ जुलै रोजी घडली आहे. या दुर्देवी घटनेत जत येथील शशिकांत म्हमाणे, त्यांची नऊ वर्षाची मुलगी श्रुती व सहा वर्षाचा मुलगा श्रेयस हे समुद्राच्या लाटेत वाहून गेले आहेत. यापैकी मुलाचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. पिता व मुलीचा मृतदेह बुधवारी मिळाले.