माजी मंत्री अमित देशमुख यांची बनावट सही करून मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागात नोकरी लावतो, असे म्हणून एकाची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी शुभम पाटील नावाच्या व्यक्ती विरोधात देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपत एकनाथ गित्ते यांनी याबाबत देहू रोड पोलिसात तक्रार दिली असून ६ लाख ६६ हजारांची फसवणूक झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई च्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागात नोकरी लावतो म्हणून एका तरुणाची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. गणपतला मुंबईच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागातील रुग्णवाहिकेवर चालक म्हणून नोकरीस लावतो असे सांगून ऑनलाइन पद्धतीने आरोपी शुभमने त्याच्या बँक खात्यात एकूण सहा लाख ६६ हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. माजी मंत्री अमित विलासराव देशमुख आणि सचिव वैद्यकीय शिक्षण विभाग, औषधी द्रव विभाग चे सौरव विजय यांची खोटी सही करून आणि बनावट पत्र तयार करून फसवणूक केली, असे तक्रारीत म्हटलं आहे.