शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत कामगारांना डब्बे पुरवणाऱ्या व्यवस्थापकाला शिवीगाळ करत मारहाण केली आहे. तर शिंदे गटाचे आणखी एक आमदार प्रकाश सुर्वे यांनी चितावणीखोर भाषण करत, शिवसैनिकांना ठोकून काढा, त्यांचे हात नाही तोडता आले तर तंगडी तोडा, असं विधान केलं आहे. या घडामोडींनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. सत्तेची मस्ती डोक्यात गेली आहे का? असा सवालही अजित पवार यांनी यावेळी विचारला आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात महागाई, वाढता जीएसटी, अतिवृष्टी असे अनेक प्रश्न प्रलंबित असताना शिंदे गटाचे आमदार चितावणीखोर भाषा वापरून मुद्द्यावरून लक्ष हटवण्याचं काम करत आहेत, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.सत्ताधारी पक्षातील आमदारांकडून केलेल्या आरेरावीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “हे सरकार स्थापन होऊन काहीच दिवस उलटले आहेत. असं असताना त्यांच्यातले काही आमदार महाराष्ट्रात संघर्ष पेटावा अशी भाषा वापरत आहेत. शिवसैनिकांना ठोकून काढा… शिवसैनिकांचे हात तोडा… हात तोडता नाही आले तर तंगडी तोडा… आरे ला कारे म्हणा… कोथळा काढा… अशी विधानं सत्ताधारी पक्षातील आमदारांकडून केली जात आहेत. सुसंस्कृत राजकारणी यशवंतराव चव्हाणांनी घडवलेल्या महाराष्ट्रात अशी भाषा वापरली जात आहे.”संतोष बांगर यांच्या कृत्याच्या समाचार घेताना अजित पवार म्हणाले की, “शिंदे गटाच्या एका बहाद्दर आमदारानं तर सरकारी कर्मचाऱ्याला मारलं आहे. याचा अर्थ तुम्ही कायदा हातात घ्यायला लागला आहात. तुम्ही स्वत:ला कोण समजता? सत्ता आली म्हणजे तुम्हाला मस्ती आली का? शेवटी कुणीही व्यक्ती असली तरी सर्वांना संविधान आणि नियम सारखेच आहेत. कायदा, संविधान आणि नियमांपेक्षा कुणीही मोठा नाही. मग तो सरकारमधला कुणीही असो किंवा महाराष्ट्रातील शेवटची कोणतीही व्यक्ती असो. त्यांना एवढी मस्ती आलेली आहे, त्यांना थांबवलं कसं जात नाही? त्यांना दोन गोष्टी समजावून सांगण्याचं काम संबंधितांचं नाही का? या सर्व घटना महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. अमृतमहोत्सवी ज्यादिवशी आपण स्वातंत्रदिन साजरा केला, त्यादिवशी आमदार अशा प्रकारची भाषा वापरतो” अशी टीकाही अजित पवार यांनी केली आहे.