कात्रज परिसरात दहशत माजविणाऱ्या ‘चुहा गँग’ या गुंड टोळीच्या प्रमुखासह साथीदारांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले. इस्माइल मौलाली मकानदार (वय २६), जावेद मेहबुब मुल्ला (वय २७), तौसिफ उर्फ मोसीन उर्फ चुहा जमीर सैय्यद (वय २८, तिघे रा. संतोषनगर, कात्रज) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत.
खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे मकानदार, मुल्ला, सैय्यद यांच्या विरोधात दाखल आहेत.
आरोपींनी ‘चुहा गँग’च्या नावाने कात्रज भागात दहशत माजविण्याचे गुन्हे केले होते. आरोपींच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती.मकानदार, मुल्ला, सैय्यद यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी तयार केला होता. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आरोपींच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले. दरम्यान, आतापर्यंत शहरातील ९४ गुंड टोळ्यांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. शहरातील बहुतांश गुंड टोळ्यांचे म्हाेरके आणि साथीदार कारागृहात असून मोक्का कारवाईमुळे गुंड टोळ्यांना जरब बसली आहे.