मुंबई : मुंबई आणि ठाण्याला गेल्या दोन दिवसांत पावसाने झोडपून काढलं. मोसमातला सर्वाधिक पाऊस गुरूवार शुक्रवारी नोंदवला गेला. जोरदार पावसाने ठाण्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्रासह कोकण भागातील रत्नागिरी, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांत पुढील तीन दिवसांपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. आज ऑरेज अलर्ट तर पुढील तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि पुण्यासाठी पुढचे 24 तास धोक्याचे आहेत, असा महत्त्वाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त वारे उत्तरेकडे वाहत आहे. त्यात गुजरातमधल्या कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या चोवीस तासात मुंबई आणि पुण्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
या ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद
दरम्यान, कल्याण, डोंबिवली, ठाण्यात गुरुवारी संध्याकाळपासून ते शुक्रवारी दिवसभरात 120 मिमीपेक्षा जास्त पावसाची, तर डोंबिवली पूर्वेत सर्वाधिक 200 मिमी आणि मुंब्य्रात 195 मिमी पावसाची नोंद झाली. टिटवाळा भागात काही गावांचा संपर्क तुटला होता. काही गृहसंकुल, चाळींमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. भिवंडीत रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आल्याने येथील रहिवाशांचे हाल झाले. उल्हासनदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा कोल्हापूर, कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी या भागांसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यात 20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाने अगदी सकाळपासूनच हजेरी लावली. संततधार पावसामुळे कमाल आणि किमान तापमान कमी झाल्याने वातावरणात थंडी जाणवत होती. 20 सप्टेंबर पर्यंत विदर्भात विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळणार आहे. पुणे, सातारा या भागात आगामी दोन दिवस घाटमाथ्यावर मुसळधार, कोकणातील पालघर, रायगड या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पुढील दोन दिवस बरसणार आहे.