अमरावती ते अकोला रस्त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

अकोला ब्रेकिंग

अकोला,८ जुन : अमरावती ते अकोलादरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (पूर्वीचे ६) वर राज पथ इन्फ्राकॉनने सलग १०९.८८ तासात ४२.२०० किमी बिटूमिनस काँक्रीटचे पेविंग करून जगातील सर्व विक्रम मोडून नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला. बुधवारी ता. ७ जून २०२२ रोजी माना कॅम्प येथे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे निर्णायक स्वप्नील डांगरिकर यांनी राजपथ इन्फ्राकॉनचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांना ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रमाणपत्र सुपूर्द केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी राज पथ इन्फ्राकॉन तर्फे ‘अखंड रस्त्यावर अखंड बिटूमिनस काँक्रीट पेव्हिंग’ या श्रेणीत ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचे ठविले.

३ जून रोजी सकाळी ७.२७ वाजता अमरावती जिल्ह्यातील लोणी पासून अखंड बिटूमिनस काँक्रीट पेव्हिंगच्या कार्याला सुरुवात झाली आणि ७ जून ला रात्री ९.२० वाजता अकोला जिल्ह्यातील नवसाल येथे १०९.८८ तासांनी पेव्हिंगचे कार्य थांबवून ८४.४०० किलोमीटरचा नवीन विश्वारेकॉर्ड राज पथ द्वारे करण्यात आला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने विश्वविक्रम झाल्याचे घोषित करताच, या विक्रमासाठी घेतलेली प्रचंड मेहनत आज अखेर फळाला आली. यावेळी उपस्थित कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या डोळ्यात अक्षरश: आनंदाश्रू तरळले. फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोष झाला.’भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘राजपथ…. राजपथ… राजपथ…. ‘असा जयघोष सर्वत्र निनादू लागला.

शिव छत्रपतींच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन, “शिवसुत्रा” नुसार या कार्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी “जावळी” ही वॉररूम या कामाच्या प्रगती, साधनसामुग्री, गुणवत्ता आणि मानवी सुरक्षितता इत्यादी बाबींवर लक्ष ठेवून होती, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांनी सांगितले.

विदर्भातील ४५-४६ अंश तापमान, अंगातून निघणार्‍या घामाच्या धारा असतानाही मागील ५ दिवस सातत्याने आव्हानात्मक ध्येय गाठण्यासाठी, दाहक उन्हाच्या झळा सोसत, रात्रंदिवस एक करणाऱ्या, सर्व अभियंता, अधिकारी आणि कामगारांच्या चेहऱ्यावरील थकवा, तणावाची जागा, विश्वविक्रमाच्या घोषणेनंतर आनंदाने घेतली.
अखेर

राजपथ इन्फ्राकॉनने भारतमातेच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त, राष्ट्राला ही अनोखी भेट दिली. आता अकोला- अमरावतीचे, विदर्भ, महाराष्ट्र आणि भारताचे नाव या निमित्ताने सातासमुद्रापार पोहोचले आहे.

ही अभूतपूर्व यशश्री खेचून आणण्यामागे कंपनीतील मनुष्यबळाची सांघिक भावना, दुर्दम्य इच्छाशक्ती, अदम्य जिद्द आणि अपरिमित चिकाटी फळाला आली.

या विक्रमी कामासाठी, प्रकल्प व्यवस्थापक, हायवे इंजिनिअर, क्लालिटी इंजिनिअर, सुरक्षितता अभियंता, सर्व्हेअर, इतर अनेक कर्मचारी आणि विविध सहयोगी कंपन्यांचे इंजिनिअर, कामगार याची निष्णात चमू अहर्निश तैनात होती. अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून, ४ हॉट मिक्सप्लांट, ४ व्हीललोडर, १ पेव्हर, १ मोबाईल फिडर, ६ टॅडेम रोलर,१ पी टी आर मशीन, १०६ हायवा, २ न्युमॅटीक टायर रोलर आदी यंत्रसामग्रीसह अभियंते, पर्यवेक्षक, मदतनीस,कारागीर असे एकूण ७२८ योद्ध्यांचे,उच्च ध्येयाने प्रेरित, मनुष्यबळ इथे कार्यरत होते. स्थानिक लोकांसह, भारताच्या सर्व भागांतून आलेल्या लोकांचा हा मिनी भारतच होता. कामावरील यंत्रसामग्री दोषरहित ठेवण्यासाठी टाटा मोटर्स, रीटजेन आदी कंपन्यांचे ५ इंजिनिअर,तंत्रज्ञ आणि अन्य अधिकारी येथे सतत लक्ष ठेवून होते.निवास व्यवस्था,भोजन व्यवस्था,वाहन देखभाल दुरुस्ती कक्ष, पेट्रोल व डिझेल पंप इ.इथे कार्यरत असून, उन्हाळ्याच्या पार्श्भूमीवर वातानुकित व्यवस्था करण्यात आली होती.
या कामाचा दर्जा राखण्यासाठी आणि तो तपासण्यासाठी सुसज्ज दर्जा नियंत्रण प्रयोगशाळा माना कँपला उभारण्यात आलेली आहे. त्यानंतरच ३४,००० मेट्रिक टन बिटूमिनससह इतर सर्व साहित्य प्रत्यक्ष कामासाठी वापरण्यात आले.

गेल्या सहा महिन्यांत, रस्त्याचे चार थर तयार करण्यात आले असून, विक्रमाच्या वेळी हा पाचवा थर टाकण्यात आला. या विक्रमाची नोंद करण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी, गिनीज बुक टीमने मंजूर केलेली 22 तज्ज्ञांची चमू तीन शिफ्टमध्ये परीक्षण करीत होती. या तज्ञांमध्ये सर्वेक्षक, अधिवक्ता, टाइम-कीपर, रस्ता अभियांत्रिकी तज्ञ आणि नामांकित महाविद्यालयांचे डीन यांचा समावेश होता. या सर्व कामावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंते देखरेख करीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *