मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे भडकले

देश – विदेश

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी आयएनएस शिक्रा येथे पोहोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे पोहोचल्यानंतर सुरक्षा व्यवस्थांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं कळतंय. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेनं आदित्य ठाकरेंना गाडीतून उतरवल्याची माहिती कळतेय. आदित्य ठाकरे हे राजशिष्ठाचार मंत्री असल्यानं ते मुख्यमंत्र्यासोबत नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्यासाठी निघाले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेनं आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न केल्यानं उद्धव ठाकरे भडकले असल्याचं कळतंय.

नेमकं काय घडलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील देहू येथील कार्यक्रमानंतर मुंबईत विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: हजर राहिले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आयएनएस शिक्रा येथे स्वागत केलं. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्र्यांसोंबत आदित्य ठाकरे देखील निघाले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेकडून आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न झाला. उद्धव ठाकरे या प्रकारामुळं सुरक्षा व्यवस्थेवर संतापल्याची माहिती आहे.

नरेंद्र मोदी यांचे मुंबईतील कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमधील जल भूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करतील. जल भूषण इमारत हे १८८५ सालापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. जुनी इमारत पाडून नवी इमारत बांधण्यात आली आहे. सन २०१६ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांना राज भवनामध्ये एक भुयार सापडले होते. शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी गुप्त ठिकाण म्हणून पूर्वी ब्रिटीश या भुयाराचा उपयोग करत होते. २०१९ साली या भुयाराचे नुतनीकरण करण्यात आले. या भुयारात बनवण्यात आलेली गॅलरी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ बनवण्यात आलेले अशा स्वरूपाचे एकमेव संग्रहालय असून मोदींच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे.

पंतप्रधान मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात देखील सहभागी होतील. हे वृत्तपत्र गेली २०० वर्ष सातत्त्याने प्रकाशित होत आहे. या दुर्मिळ विक्रमाचे स्मरण म्हणून या प्रसंगी एक टपाल तिकीट देखील प्रकाशित केले जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *