उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची बैठक संपली; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

ताज्या घड्यामोडी

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपलं प्रशासकीय काम थांबवलं नाही. गेल्या काही दिवसांत त्यांनी अनेक योजनांची घोषणा केली आहे. यानंतर आजही मंत्रीमंडळाची बैठक पार पडली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप हंगामाबाबत गांभीर्याने आढावा घेण्यात आला. राज्यातील पेरण्याची स्थिती समाधानकारक नसल्याची माहिती देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

गेल्यावर्षी राज्यात आजच्या घडीला सरासरी २७० मिलीमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा मात्र केवळ १३४ मिमी. पाऊस झाला आहे. गतवर्षी आजच्या दिवशी पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र खरीपाखालील क्षेत्रापैकी केवळ १३ टक्के (२०.३० लाख हेक्टर) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेणार
कमी पावसामुळे शहरांमध्ये देखील पाणीपुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे उद्या (२९ जून ) नगर विकास खात्याचा कार्यभार असलेले मंत्री सुभाष देसाई हे सर्व पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून पाणी पुरवठ्याचे नियोजन कसे केले जाईल, याबाबत आढावा घेणार आहेत.

राज्यात ४९६ टँकर्सने पाणीपुरवठा
राज्यात २७ जूनअखेर ६१० गावे आणि १२६६ वाड्यांना ४९६ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय टँकर्सची संख्या ६६ तर खाजगी टँकर्सची संख्या ४३० इतकी आहे. पावसाला सुरुवात झाल्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत टँकर्सची संख्येत काहीशी घट झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *