
गुवाहाटीतील शिवसेनेचे काही आमदार परत येतील, असे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना वाटते. मात्र, त्यांना फक्त वेडी आशा आहे हो, प्रत्यक्षात असे काहीही घडणार नाही, असे वक्तव्य बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले. केवळ अपक्षांनी भाजपच्या बाजूने मतदान केलं तरी हे सरकार पडेल, ३९ लोकं तर सोडूनच द्या. तुम्ही बंडखोर आमदारांना वाटेल तसं बोलणार, मग ते तुम्हाला येऊन मतदान करणार, ही शिवसेनेच्या नेत्यांना असलेली वेडी आशा आहे. शिवसेनेतील मोठ्या नेत्यांना हीच आशा आहे, आता यावर मी काय बोलणार? लहान मुलं अशी विधानं करू शकतात. पण मोठी लोकंच अशी बोलायला लागली तर बघायलाच नको. गुवाहाटीत शिवसेनेचे सर्व आमदार आनंदात आहेत. वाटल्यास आम्ही त्यांचे व्हिडिओ शेअर करायला तयार आहोत. त्यामुळे ३९ बंडखोर आमदारांपैकी कुणीही शिवसेनेकडे परत जाण्याची शक्यता नाही, असा दावा दीपक केसरकर यांनी केला.