मेंढ्या व शेळ्यांची काळजी

Agricultural

राज्यात मेंढीपालन प्रामुख्याने स्थलांतरीत पद्धतीने करण्यात येते. राज्यातील नाशिक, कोकण इत्यादी विभागातून बहुतांश मेंढपाळ हिरव्या चाऱ्याकरीता राज्याच्या पुणे विभागात स्थलांतरीत होत असतात. या मेंढ्याची मुळ मुक्कामी परतीची वेळ पावसाळ्यापूर्वीची किंवा सुरुवातीचा पावसाळा अशी असते. या मेंढ्यांच्या कळपासोबत शेळ्याही असण्याची शक्यता असते. या स्थलांतरादरम्यान त्यांना वातावरणाच्या विविध बदलांना तोंड द्यावे लागते. पूर, अतिवृष्टी, गारपीट, शीत लहर किंवा उष्ण लहरी तसेच विविध विषबाधा यामुळे मेंढ्या व शेळ्यांमध्ये मर्तुक होण्याची शक्यता असते. यामुळे मेंढी व शेळीपालक शेतकरी व पशुपालक यांना आर्थिक नुकसानीस तोंड द्यावे लागते.

सध्या राज्यात विविध अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. फिरतीवर असणारे स्थलांतरीत मेंढ्या व शेळ्यांचे काही कळप अद्याप ही मूळ मुक्कामी पोचण्यासाठी मार्गक्रमण करत असतील, अशा कळपातील मेंढ्या व शेळ्यांना अतिवृष्टीचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात आणि अनुषंगिक गारपीट, वीज पडणे पूरस्थिती अशा आपत्तीत पशुधनाची घ्यावयाची काळजी यासाठी हवामानाच्या अंदाजावर लक्ष ठेवून पशुपालकांना सतर्क करणे आवश्यक आहे.

मेंढ्या व शेळ्यांची पावसाळ्यात घ्यावयाची देखभाल

पावसाळ्यात पोषक वातावरणामुळे विविध रोगजंतूची वाढ झपाट्याने होत असते. यासाठी मेंढ्या शेळ्या व त्यांचा निवारा, चारा, खाद्य व पाणी यांची जैवसुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. पशुधनाच्या निवाऱ्याची वेळीच डागडूजी करून घ्यावी. निवारा नसल्यास निवारा तयार करावा. निवारा शक्यतो कोरडा राहील याची दक्षता घ्यावी. गोठ्यातील जमिनीचा ओलावा कमी करण्यासाठी चुन्याची फक्की शिंपडावी. शेडचे व निवाऱ्याचे नियमित निर्जंतुकीकरण करावे. पावसाचे पाणी मेंढ्या व शेळ्यांच्या निवाऱ्या जवळ साचू नये यासाठी आवश्यक चर काढुन ते साठणार नाही याची दक्षता घ्यावी. मेंढ्या व शेळ्या यांना बंदीस्त जागेत बांधावे. गोठ्याच्या / निवाऱ्यास उघड्या भागावर कापडी अथवा प्लास्टीकच्या शीटद्वारे झाकावे जेणे करून त्याचा पाऊस व थंडी पासून बचाव व्हावा. पावसामुळे जमिनीचे तापमान कमी झालेले असते त्यात ओलसर पणा ही असतो. यापासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी कोरडा चारा अथवा भुसा याचे अच्छादन जमिनीवर करावे. शक्य असल्यास पशुधनाच्या आजूबाजूस शेकोटी करावी, जाळ लागून नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. स्थलांतर करणाऱ्या आणि रानात मेंढ्या व शेळ्यांच्या बसवणाच्या कळपांचे पशुपालक यांनी पावसाची सततधार अथवा कडाक्याची थंडी असल्यास विशेष खबरदारी घ्यावी. शक्यतो मेंढ्या व शेळयांना बंदिस्त उबदार निवारा मिळेल याची दक्षता घ्यावी. नविन हिरव्या चाऱ्यामुळे हगवण, तसेच एचसीएन व नायट्रेट वीषबाधा, हायपोमॅग्नेशियमीक टिटॅनी यासारख्या विविध रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

वाळलेल्या चाऱ्याची उपलब्धता ठेवावी तो भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. पशुधनास पावसात चरावयास सोडू नये. हिरवा चारा कापून पुरेसा साठा करून ठेवावा. नदीकडील भागात चरावयास सोडू नये. शक्यतो चारा पावसाने भिजलेला असू नये, तसेच साठवलेला चारा पावसाने भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. साठवण कोरड्या जागेत असावी, बुरशी वाढणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच बुरशीयुक्त चारा देण्याचे शक्यतो टाळावे. पावसाळ्यात वातावरणाची तीव्रता / पावसाची दीर्घकालीन उघडीप / तणनाशक किंवा किटनाशक फवारणी यांच्यामुळे उगवलेल्या गवतावर / चाऱ्यावर विपरीत परिणाम होऊन त्यातील विषद्रव्यांची साठवण वाढते त्यामुळे ते जास्त घातक ठरतात. नायट्रेट व एचसीएन विषबाधेच्या घटना वाढण्याची शक्यता जास्त असते. मुरघास साठवण चर यामध्ये पावसाचे पाणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी. अतिवृष्टी, शीतलहर पशुधनास गुळ टाकुन घुगऱ्या / कण्या (पेज/कांजी ) पातळ व कोमट झाल्यास देता येतील जेणेकरून पशुधनाच्या शरीरास उष्णता / उर्जा मिळेल. तथापि जास्त मात्रा देऊ नये. अॅसिडोसीस होण्याचा धोका असतो. स्वच्छ व निर्जंतुक पाणी पशुधनास पिण्यास उपलब्ध असावे. विहीर, कुंपनलिका किंवा सार्वजनिक पिण्याचे पाणी वितरण व्यवस्था इत्यादी खात्रीशीर स्त्रोतांपासून उपलब्ध होणारे पाणीच पिण्यास देणे सुरक्षित असते. पशुधन साचलेले पाणी पिणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पशुधनास साचलेले पाणी पिण्यास देऊ नये. पिण्याच्या पाण्याच्या हौदाची स्वच्छता करावी. शेवाळ जमलेले असल्यास काढून टाकावे. या हौदास चुना लावून घ्यावा. या आपत्तीच्या वेळी मेंढ्यांची लोकर कातरणी थांबवावी. वातावरणात योग्य बदल झाल्यास परत लोकर कातरणी सुरू करण्यास हरकत नाही. गाभण, विण्यायोग्य, विलेल्या व नवजात करडांची निगा राखण्याची दक्षता खास करून घेण्यात यावी. साथरोगांचा व संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या लसीकरण विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे / तज्ञाच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे. जंत /कृमीनाशक औषधी द्यावे, परजीवींच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधक औषधाची फवारणी करावी. माशांच्या नियंत्रणासाठी आवश्यक प्रतिबंधक औषधी फवारणी करावी. एचसीएन, नायट्रेट, ऑक्झलेट, अल्कलॉईड इत्यादी विषबाधा होऊ नये यासाठी खात्रीशीर स्रोतां पासून उपलब्ध होणारा चाराच कापून अथवा कुट्टीच्या स्वरूपात मेंढ्या व शेळ्यांना देणे योग्य असते. स्थलांतरीत मेंढ्या व शेळ्या रानात बसविण्याची पद्धत असते. सदर मेंढ्या व शेळ्या त्यांना बसविलेल्या रानातच लेंड्या व मुत्र विसर्जित करतात. अशावेळी थोड्या थोड्या कालावधीने मेंढ्या व शेळ्यांची बसविण्याची जागा बदलावी जेणे करून मेंढ्या व शेळ्यांना अस्वच्छ जागेत वावरावे लागणार नाही व आरोग्याचे प्रश्न उद्भवणार नाहीत. या काळात पशुधनास आजारपणापासून वाचविण्यासाठी घटसर्प रोग प्रतिबंधक लस प्राधान्याने द्यावी. अतिथंड वातावरणामुळे हायपोथर्मिया, अपचन, न्युमोनिया या आजारास पशुधन बळी पडू शकते. यासाठी कॅल्शियम बोरोग्लुकोनेट (काळजीपूर्वक वापरावे), डेक्झामिथॅझोन (गर्भधारणा झालेल्या पशुधनात आवश्यक असल्यासच कमी डोसेसमध्ये वापरावे), डेक्सट्रोज, लिव्हर टॉनिक, जिवनसत्वे तसेच खनिज मिश्रणे यांचा वापर करता येईल. पशुधनाच्या खुरांना अँटीसेप्टीक सोल्युशन लावावेत. जखमा असल्यास त्यांची ड्रेसिंग करावी. न्युमोनिया किंवा श्वसनसंस्थेचे आजार असल्यास प्रतिजैविके व थिओफायलीन, डेक्झामिथॅझोन (गर्भधारणा झालेल्या मेंढ्या व शेळयांमध्ये अत्यावश्यक असल्यासच कमी डोसेस मध्ये वापरावे) यासारखी औषधी गरजेनुसार वापरता येतील. पावसाळ्यात मृत पशुधनाची विल्हेवाट लावणे जास्त महत्वाचे आहे. मृतपशुधनाची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने करावी जेणेकरून रोगराई वाढण्यास आळा बसेल. मृत पशुधनाचे शरीर जाळावे. ते शक्य नसल्यास पशुधनाच्या आकारमानाच्या अनुषंगाने संयुक्तिक आकाराचा खड्डा करावा त्यात चुन्याची फक्की टाकावी. त्यावर मृत पशुधनाचे शरीर ठेवून त्यावर खडेमिठाचा थर द्यावा तसेच चुन्याच्या फक्कीचा थर द्यावा. उपयुक्त जिवाणूचे कल्चर मिळाल्यास ते टाकावे व खड्डा बुजवावा. खड्डा बुजवल्यास त्यावर दगड ठेवावेत किंवा काटेरी वनस्पतीच्या फांद्या ठेवाव्यात जेणे करून वन्य श्वापद मृत शरीर उकरून काढणार नाहीत. आपत्तीच्या वेळी नजिकच्या पशुवैद्यक संस्थेस त्वरीत संपर्क साधवा.

-माहितीस्त्रोतः जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचे कार्यालय.

संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अकोला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *