त्या एका मताच्या मोबदल्यात मनसेला शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान…

Maharashtra State

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट राज यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी पोहोचले. ही सदिच्छा भेट असल्याचं भाजपाकडून सांगण्यात आलं असलं तरी या भेटीच्या पार्श्वभूमीवर तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. अशातच या भेटीदरम्यान उपस्थित असणारे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारला विश्वासदर्शक ठरावादरम्यान पाठिंबा देऊन केलेल्या मदतीसंदर्भात सूचक विधान केलं आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांसोबत सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाच्या बाजूचे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मतदान केलं होतं. याच पार्श्वभूमीवर मनसे मंत्रीमंडळामध्ये सहभागी होणार का या प्रश्नावर नांदगावकर यांनी पक्षाची भूमिका पत्राकारंसमोर मांडलीय.“अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका आगामी काळामध्ये होत आहेत. याचदरम्यान मनसे, भाजपाची वाढती जवळीक उघडपणे पहायला मिळेल का?,” असा प्रश्न नांदगावकर यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “हा विषय सध्या तरी अनुत्तरित आहे. त्याच्यावर काही भाष्य करता येणार नाही. अजून निवडणुकांचाच ठिकाणा नाही. ज्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या त्या पुढे गेल्या,” असं नांदगावकर म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी, “सध्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकांसंदर्भात बोलूयात. आमच्याकडे एक मत आहे आणि ते मत आम्ही त्यांना देणार हे ही तुम्हाला माहीत आहे,” असंही म्हटलंय.मनसे शिंदेंच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार का?, असा प्रश्न नांदगावकर यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “पक्षाने त्यांना मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्याच्याबद्दल काय करायचं आहे हे त्यांनी ठरवायचं आहे,” असं सूचक विधान नांदगावकर यांनी केलं. या प्रश्नावर त्यांनी थेट हो किंवा नाही असं उत्तर देणं टाळलं.त्याचप्रमाणे मनसेनं विश्वासदर्शक ठरावादरम्यान भाजपाच्या बाजूने मतदान केल्याच्या मुद्द्यावरुन पत्रकारांनी, या मदतीचा भाजपाने विचार केला पाहिजे? असा प्रश्न नांदगावकर यांना विचारला. त्यावर मनसेच्या नेत्याने, “प्रत्येक गोष्टीत आपण जर मदत केली तर मोबदला मिळाला पाहिजे असं काही नाही. राज ठाकरेंनी कधीही मोबदला मिळावा ही भूमिका ठेऊन कधीच मदत केलेली नाही,” असं सांगितलं.त्याचप्रमाणे नांदगावकर यांनी, “राजकारणात सगळ्यांवर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. परिस्थितीनुसार राजकारणात बदल होत असतात. एकनाथ शिंदेंची परिस्थिती बदलली असं त्यांना वाटलं म्हणून ते बदलले,” असंही म्हटलं. “काय परिस्थिती असेल आणि नेमकी ती परिस्थिती आल्यानंतर दोन मित्र काय निर्णय घेतात एकमेकांच्या पक्षाविषयी, भूमिकेविषयी आणि मदत करण्याविषयी, एकमेकांना सहकार्य करण्याविषयी हे तेव्हा ठरतं. सध्या तरी आमच्यासमोर तशी काही परिस्थिती दिसत नाही,” असं नांदगावकर यांनी नमूद करत युतीची शक्यता फेटाळली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *