पावसाच्या पाण्यामुळे रहिवाशांचे राहणे झाले कठीण
लवकरात लवकर परिस्थिती सुधारण्याची स्थानिकांची मागणी
स्थानिक प्रभाग क्रमांक १ मधील भारत नगर मध्ये रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून पावसाच्या पाण्यामुळे या भागात रहिवाशांचे राहणे कठीण झालेले आहे.
प्रभाग क्रमांक १ चा भाग असलेल्या भारत नगर मध्ये रस्ते नाहीत किंवा नाल्या सुद्धा नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जात नाही. परिणामी पाणी रस्त्यावर तसेच जागा मिळेल तेथे साचते. रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट होऊन या रस्त्यांवरून रहदारी करणे अशक्य झाले आहे. शिवाय साचलेल्या पाण्यामुळे विविध आजार निर्माण होत आहेत. रस्त्यावरील चिखलामुळे विद्यार्थ्यांना शाळेत सुद्धा जाता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या रस्त्यांबाबत व इतर असुविधांबाबत महानगर पालिकेला नागरिकांनी निवेदन दिले होते. परंतु या भागातील नागरिकांना सुविधा मिळाल्या नाहीत. गेल्या काही दिवसांपासूनच्या सततच्या पावसामुळे या भागातील परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे. तरी महानगरपालिकेने लवकरात लवकर लक्ष देऊन ही परिस्थिती सुधारावी, अशी नागरिकांची मागणी आहे.