इंडियन क्रिकेट प्रीमियर लीग या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा नुकताच यशस्वी समारोप झाला. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या स्पर्धेतील सामने देशातील सहा क्रिकेट मैदानांवर खेळवण्यात आले होते. या सहा ठिकाणांवरील ग्राऊंडस्टाफने आयपीएल २०२२ स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सातत्याने कष्ट घेतले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ त्यांच्या या कामगिरीवर खुश आहे. या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर खुश होऊन बीसीसीआयने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. बीसीसीआयने या आयपीएल हंगामात सामने आयोजित केलेल्या सहा ठिकाणींचे क्युरेटर आणि ग्राऊंडमन्ससाठी 1.25 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी सोमवारी एका ट्विटमध्ये मैदानावरील कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली.