
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरामधील गांधी नगर येथे देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजचे (IIBX) उद्घाटन केले. या बुलियन एक्सचेंजच्या माध्यमातून आता देशातील सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांना परदेशातून सोने आयात करणे सोपे होणार आहे. शांघाय गोल्ड एक्सचेंज आणि बोर्सा इस्तंबूलच्या धर्तीवर हे एक्सचेंज स्थापन करण्यात आले आहे. या एक्सचेंजद्वारे डीलर्स, रिफायनरीज आणि परदेशी बँकांना भारताकडे आकर्षित करण्यास मदत होणार आहे.
गांधीनगर जवळील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT सिटी) येथे आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजची स्थापना करण्यात आली आहे. देशातील हे पहिले आंतरराष्ट्रीय सराफा एक्सचेंज असेल. भविष्यात एक्सचेंजमध्ये चांदीचा व्यापार करण्याची योजना आहे, परंतु सध्या फक्त सोन्याच्या व्यापाऱालाच मान्यता देण्यात आली आहे.
सध्या फक्त काही बँका आणि केंद्रीय बँकांनी मंजूर केलेल्या नामांकित एजन्सींना थेट सोने आयात करण्याची परवानगी होती. आता देशातील पहिले आंतरराष्ट्रीय बुलियन एक्स्चेंज सुरू झाल्यानंतर, पात्र ज्वेलर्स सोन्याची थेट आयात करू शकतील. त्यावर स्थानिक शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, ही सूट सोने शहराबाहेर नेईपर्यंतच मिळणार आहे.