शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. याआधी रविवारी (३१ जुलै) ईडीने राऊतांच्या मैत्री या बंगल्यावर छापेमारी करत कागदपत्रांची तपासणी केली. तसेच या छापेमारीदरम्यान संजय राऊतांची ९ तास चौकशी करण्यात आली. राऊतांवरील या कारवाईनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच या संकटकाळात मी तुमच्या सोबत आहे, असे आश्वास ठाकरे यांनी राऊत यांच्या कुटुंबीयांना दिले. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या याच भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ठीक आहे. चांगले आहे, असे म्हणत या प्रकरणावर जास्त बोलण्यास टाळले आहे.“आजच्या बैठकीत केंद्र सरकारच्या योजना प्रभावीपणे राबवण्यावर चर्चा करण्यात आली. कुठलीही तपास संस्था पुराव्यांच्या आधारावर कारवाई करते. त्याच पद्धतीने ईडीने कारवाई केली आहे. आता या प्रकरणावर न्यायालय काय तो निर्णय घेईल. मी यावर अधिक बोलणार नाही,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.तसेच उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची सोमवारी (१ ऑगस्ट) भेट घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. याबाबत प्रश्न विचारताच ठिक आहे. चांगले आहे, असे म्हणत फडणवीस यांनी अधिक बोलण्याचे टाळले.