जालना: जालना एमआयडीसीतील दोन मोठ्या स्टील कंपन्या व त्या कंपन्यांशी संबंधित व्यावसायिकांसह १० ते १२ व्यावसायिक आणि शहर आणि जिल्ह्यात फायनान्स करणारे व्यावसायिक विमलराज सिंघवी यांच्यावर आयकर विभागाने छापे टाकले. या कारवाईमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. आयुक्त स्तरावरील दोन डझनहून अधिक अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते. सुमारे ४८० जणांच्या पथकाने जालन्यात तळ ठोकत तब्बल तीन दिवस ही कारवाई केली. या छाप्यामध्ये पथकाच्या हाती काय लागले, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. सध्या बँक खात्यांचा शोध सुरू आहे.बुधवारी (३ ऑगस्ट) सकाळी जालना शहरात गाड्यांवर विवाह सोहळ्याचे स्टिकर लावून प्राप्तिकर विभागाच्या शंभरपेक्षा जास्त गाड्या पोहोचल्या. या गाड्यांवर ‘राहुल आणि अंजली’ असे स्टिकर लावलेले होते. या गाड्यांमधून तब्बल ४८० अधिकारी आणि कर्मचारी जालन्यात आले होते. सुरुवातीला जालनेकरांना काहीही समजलं नाही. कुणाच्या तरी कार्यक्रमासाठी या गाड्या आल्या असाव्यात असे वाटत होते. त्यामुळे कोणाला शंका आली नाही, परंतु श्रावणात विवाह सोहळे अत्यंत आणीबाणीची स्थिती असेल तरच होतात. हे पाहुणे विवाह सोहळ्यासाठी नव्हे तर झाडाझडती घेण्यासाठी आल्याचे कळताच अनेकांच्या तोंडचे पाणीच पळाले.ही कारवाई तब्बल तीन दिवस चालली. या धाडींसाठी आयुक्त स्तरावरील अधिकारीही कारवाईच्या ठिकाणी ठाण मांडून होते. मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद येथील अधिकाऱ्यांचा समावेश या पथकात आहे. हे लोक एमआयडीसीतील कारखाने, व्यापारी प्रतिष्ठाने आणि त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.सुरुवातीला शहरातील जिंदल मार्केटमधील ३ दुकाने सील करण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्टिकर चिकटवले आणि काही तरी धाड असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पण, कुणालाच कळत नव्हते की हे अधिकारी आयकर विभागाचे आहेत, ईडीचे आहेत की जीएसटीचे आहेत. कारण, ज्या व्यावसायिक आस्थापने आणि घरांवर छापे टाकण्यात आले ते स्टील उद्योगाशी, लोखंडी सळ्यांच्या खरेदी-विक्रीशी संबंधित असल्याचेही सांगण्यात आले. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही शहरातील तीन उद्योजकांवर छापे टाकण्यात आले होते, मात्र त्यापूर्वी एवढ्या मोठ्या संख्येने अधिकाऱ्यांचा ताफा कधीच छापे टाकण्यासाठी आला नव्हता.