विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांची निवड झाल्याने जयंत पाटील नाराज

Maharashtra State

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. अजित पवारांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

याबाबत विचारलं असता आपण नाराज नसल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं आहे. ते पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी अजित पवारांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याने तुम्ही नाराज आहात का? असं विचारलं असता जयंत पाटील म्हणाले, “माझ्याकडे पाहून तुम्हाला असं वाटतं का? मी नाराज नाहीये.”विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती झाल्यानंतर मधल्या काळात तुम्ही अलिप्त होता, याचं कारण काय? असा प्रश्न विचारला असता जयंत पाटील म्हणाले, “मी अलिप्त नव्हतो. मी माझ्या मतदारसंघात नगरपालिका निवडणुकीची तयारी करायला पूर्णवेळ दिला होता. शहरातील प्रत्येक वार्डनुसार मी बैठका घेत होतो. त्यामुळे मी अलिप्त राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मीच पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे मी कुणावर नाराज व्हायचं? अजित पवारांची पक्षाने नियुक्ती केली आहे. सगळ्यांनी विचार करून ही नियुक्ती केली आहे. त्यामुळे मी नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही. पण मला कळत नाही की, अशा बातम्या बाहेर कशा येतात.”यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या खोळंबलेल्या विस्तारावरही भाष्य केलं आहे. कोणत्याही राज्याच्या मंत्रिमडळात किमान १२ मंत्री असावे, असा नियम आहे. मात्र, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दोघांच्या मंत्रिमंडळाने सुमारे ७०० हून अधिक निर्णय घेतले आहेत. तसेच दोन आठवड्याच्या आत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. पण अद्याप निवडणुकांची घोषणा करण्यात आली नाही, असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *