झिम्बाब्वे दौऱ्यासाठी राहुलकडे नेतृत्व; ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय पथकाने तंदुरुस्त जाहीर केल्याने भारतीय संघात निवड

Sport

पीटीआय, नवी दिल्ली : अनुभवी फलंदाज केएल राहुलला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वैद्यकीय पथकाने गुरुवारी तंदुरुस्त जाहीर केल्यानंतर आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली.

झिम्बाब्वेमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या (१८, २०, २२ ऑगस्ट) एकदिवसीय मालिकेसाठी आधी डावखुरा सलामीवीर शिखर धवनकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. मात्र, आता राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आल्याने धवन उपकर्णधारपद सांभाळेल.राहुल मे महिन्यात झालेल्या ‘आयपीएल’नंतर एकही सामना खेळलेला नाही. त्याला सुरुवातीला दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहावे लागले होते आणि त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली. त्यातून सावरल्यानंतर तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत खेळणार होता; परंतु त्यापूर्वी त्याला करोनाची बाधा झाल्याने त्याचे पुनरागमन लांबणीवर पडले. राहुलला करोनातून सावरण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने त्याची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात निवडही झाली नव्हती. मात्र, आता राहुलने निवडीसाठी आवश्यक तंदुरुस्तीचे सर्व निकष पूर्ण केल्याचे ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय पथकाकडून सांगण्यात आले आहे.

चकब्वा कर्णधार

नियमित कर्णधार क्रेग एव्‍‌र्हाइन पायाच्या दुखापतीमुळे भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी मुकणार असून यष्टीरक्षक-फलंदाज रेगिस चकब्वा झिम्बाब्वेचे नेतृत्व करेल.

संघ : रेगिस चकाब्वा (कर्णधार), रायन बर्ल, तनाका चिवांगा, ब्रॅडली इव्हन्स, ल्यूक जोंगवे, इनोसंट काया, टी. कैटानो, क्लाइव्ह मडांडे, वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमनी, जॉन मसारा, टोनी मुन्योंगा, रिचर्ड एन्गरावा, व्हिक्टर एनयाउची, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड टिरिपानो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *