पुढच्या 48 तासात मुंबईला पावसाचा इशारा, तर मराठवाडा विदर्भात धुवाँधार पाऊस

Maharashtra State

मुंबई, 20 ऑगस्ट : राज्यात मागच्या चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने सूर्यदर्शन झाले. दरम्यान राज्यात काही जिल्ह्यात पुन्हा पावसाची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया चंद्रपूर गडचिरोली व नागपूर या पाच जिल्ह्याला आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे प्रशासनाने सांगितले. सोबतच मध्य प्रदेश मधील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला त्यामुळे विदर्भातील काही नद्यांना महापूर येऊ शकतो अशी देखील भीती हवामान विभागाकडून व्यक्त केली गेली आहे.

दरम्यान मुंबईत जुलै आणि ऑगस्टमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने, यावर्षी शहरातील मोसमी पावसाने आधीच 2,000-मिमीचा टप्पा ओलांडला आहे. चार महिन्यांच्या हंगामाला अजून दीड महिना बाकी असल्याने मुंबईत हंगामी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 ते 48 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ने उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी येलो अलर्ट दिला आहे. तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच विजांच्या गडगडाटासह वादळी आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे (डीप डिप्रेशन) विदर्भात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. आज (ता.20) पूर्व विदर्भातील जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. पूर्व मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मान्सूनची आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्चिमेकडील टोकहिमालय पर्वताच्या पायथ्याकडे सरकले आहे. पूर्वेकडील टोक आज (ता. 20) दक्षिणेकडे येण्याचे संकेत आहेत. पाकिस्तान आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्याला समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.दरम्यान घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू असून, कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. उर्वरित राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. आज नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. कोकणासह घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे वादळी प्रणालीत रूपांतर झाले आहे.

ओडिसातील बालासोरपासून 200 दिघापासून 140 किलोमीटर पूर्वेकडे तर पश्चिम बंगालमधील सागर बेटांपासून 100 किलोमीटर आग्नेयेकडे या प्रणालीचे केंद्र आहे. ओडिशातील बालासोर आणि पश्चिम बंगालमधील सागर बेटांजवळ ही प्रणाली जमिनीवर येणार आहे. पुढे ही प्रणाली पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, झारखंड उत्तर छत्तीसगडकडे येण्याचे संकेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *