चंद्रपूर जिल्ह्यात आढळला दुर्मिळ जहाल पट्टेरी मण्यार

Maharashtra State

चंद्रपूर|चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे जहाल विषारी पट्टेरी मण्यार साप आढळून आला. चार फूट लांबीच्या या सापाला सर्पमित्रांनी पकडले. सापाला मुक्त अधिवासात सोडण्यात आले आहे. पट्टेरी मण्यार लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात सापडल्याच्या अनेक नोंदी आहेत. मात्र चंद्रपूरात या सापाच्या नोंदी नाहीत. ब्रम्हपुरी हा तालुका गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे पुरात हा साप वाहत आल्याची शक्यता आहे.जहाल विषारी साप असला तरी मानवाला दंश केल्याची एकही नोंद या दोन्ही जिल्ह्यात नाही. ब्रम्हपुरी शहरातील पेठ वॉर्ड येतील विजय अंबादे यांच्या राहत्या घरी चार फूट लांबीचा हा पट्टेरी मण्यार साप आढळून आला. साप असल्याची माहिती सर्पमित्र गणेश सातरे, सार्थक मेहर यांना देण्यात आली.सर्पमित्रांनी पकडले व मुक्त अधिवासात सोडण्यात आलेे. पट्टेरी मण्यार हा साप भारतात प्रामुख्याने पश्चिम बंगाल,आसाम ,बिहार व पूर्व महाराष्ट्रातील वैनगंगा नदीकाठच्या भागात आढळून येतो. गडचिरोली जिल्ह्यात हा साप सापडल्याचा नोंदी आहेत. मण्यार किंवा मणेर ही भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक जात आहे. (इतर विषारी साप- नाग, फुरसे आणि घोणस.) मण्यारच्या काही उपजातीही आहेत. साधा मण्यार अथवा मण्यार, पट्टेरी मण्यार, व काळा मण्यार या तीन जाती भारतात आढळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *