आज अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान, स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी याप्रकारावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. नळावर जसे भांडणं होतात, तसे भांडणे हे विधान भवनामध्ये होत आहेत. या आमदारांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे, असे ते म्हणाले.विधानभवनाच्या पायऱ्यांवर हाणामारी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना थोडी तरी लाज वाटली पाहिजे. सामान्य जनतेने आपल्याला कशासाठी निवडून दिलेले आहे. सामान्य जनतेचे प्रश्न विधान भवनामध्ये मांडावेत. सामान्यांच्या हिताचे कायदे करून घ्यावेत. याच्यासाठी यांना सभागृहात पाठवले. मात्र, हे लोक नळावर जसे भांडणं होतात, तसे भांडणे हे विधान भवनामध्ये करत आहे. नळावरच्या अड्डयासारखा विधानभवनामध्ये सुद्धा भांडणाचा अड्डा तयार केलेला आहे, अशी टीका रविकांत तुपकर यांनी केली आहे.महाराष्ट्रमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावे, अशी मागणी जनतेची आहे. शेतकरी हवालदिल आहे. मंत्रालयात समोर एक शेतकरी पेटून घेतो आहे. रोज आत्महत्या होत आहेत. मुले बेरोजगार झालेली आहेत. त्यांना नोकऱ्या नाहीत आणि सामान्य जनता भरडली जात असताना ज्यांच्याकडे आम्ही अपेक्षेने पाहायचं ते आमदार आज लहान पोरांसारखी भांडणं करत आहेत, असेही ते म्हणाले.