आझाद यांचा राजीनामा अत्यंत दुर्दैवी! पत्राची वेळ आणि तथ्यही चुकीची, राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया

देश – विदेश

गुलाम नबी आझाद यांच्या पत्राची वेळ आणि त्यातील तथ्यं चुकीची आहेत, अशी प्रतिक्रिया आझाद यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली आहे. ७३ वर्षीय गुलाम नबी आझाद यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देताना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस खासदार राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. सत्ताधारी भाजपाविरोधात काँग्रेस देशव्यापी संघटन करण्याच्या तयारीत असताना पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने राजीनामा देणे अत्यंत दुर्दैवी आहे, असे रमेश यांनी म्हटले आहे.“ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचं माध्यमांनी प्रसिद्ध केलेलं पत्र आम्ही वाचलं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि संपूर्ण पक्ष सत्ताधारी भाजपाविरोधात महागाई, बेरोजगारी आणि ध्रुवीकरणाविरोधात लढाईत उतरले आहेत. ४ सप्टेंबरला ‘महंगाई पर हल्लाबोल’ हे आंदोलन आणि ७ सप्टेंबरला कन्याकुमारीतून ‘भारत जोडो’ यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात असताना आझाद यांचा राजीनामा दुर्दैवी आहे” असे काँग्रेसने म्हटले आहे.गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधीवर थेट निशाणा साधला आहे. राहुल गांधींमध्ये अपरिपक्वता असून त्यांनी पक्षातील सल्लागार यंत्रणा उद्धवस्त केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राहुल गांधीची वर्तवणूक बालिश असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला आहे. काँग्रेसमध्ये बदलांसाठी आग्रही जी-२३ गटाचे आझाद सदस्य होते. काही दिवसांपूर्वी आझाद यांच्यावर काँग्रेसने जम्मू काश्मीरच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली होती. या पदावर नियुक्ती होताच काही तासातच आझाद यांनी राजीनामा दिला होता. प्रकृतीच्या कारणास्तव जबाबदारी स्वीकारण्यास सक्षम नसल्याचे आझाद यांनी म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *