नरेंद्र मोदींच्या रॅलीत बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट?

देश – विदेश
  • ईडीने केला मोठा दावा

नवी दिल्ली :  राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय तपास यंत्रणा  आणि अंमलबजावणी संचालनालयाने  देशातील वेगवेगळ्या राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली एकूण १५ राज्यांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पीएफआयकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटणा येथील एका रॅलीला लक्ष्य करण्याची योजना आखण्यात आली होती, असा दावा ईडीने केला आहे. तसेच भारतात वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट घडवून आणण्यासाठी पीएफआयतर्फे घातक शस्त्रे आणि स्फोटके गोळा केली जात होती, असेही ईडीने म्हटले आहे.

गुरुवारी केरळमधून पीएफआय सदस्य शफीक पायथ या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर ईडीने वरील दावा केला आहे. या दाव्यानुसार यावर्षी १२ जुलै रोजी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटणा येथील रॅलीला लक्ष्य करण्याचा पीएफआयचा कट होता. याआधी इंडियन मुजाहिद्दीनसी संबंध असलेल्या दहशतवाद्यांनी ऑक्टोबर २०१३ मध्ये मोदी यांच्या पाटणा येतील रॅलीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला होता.

यासोबतच मागील काही वर्षांपासून पीएफआय तसेच पीएफआयशी संबंध असलेल्या संस्थांच्या खात्यामध्ये १२० कोटी रुपये जमा करण्यात आल्याचेही ईडीने म्हटले आहे. यातील काही रक्कम देशातील तसेच काही परदेशी संशयास्पद स्त्रोतांकडून रोख स्वरुपात जमा करण्यात आली होती. ही रक्कम देशात दहशतवादी कृत्ये तसेच दंगली घडवण्यासाठी वापरण्यात येत होती, असा दावा ईडीने केला आहे.

दरम्यान, दहशतवादी कारवाया केल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) देशभरातील १५ राज्यांत छापे टाकून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित सुमारे १०६ जणांना अटक केली आहे. महाराष्ट्रातही दहशतवाद विरोधी पथकाने राष्ट्रीय तपास यंत्रणेसह संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत २० हून अधिक जणांवर कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *