काटेपूर्णाचे ९ तासानंतर केले दरवाजे बंद; वानचा विसर्ग कायम

अकोला

अकोला : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पाचे नऊ तासानंतर उघडलेले दोन दरवाजे बंद करण्यात आले. तर वान प्रकल्पातून वाढवलेला विसर्ग अद्याप कायम ठेवण्यात आला आहे. प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्यास काटेपूर्णाचे दरवाजे पुन्हा केव्हाही उघडले जातील, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पाची साठवण क्षमता ८६.३५ दलघमी आहे. पाणी साठवण्याच्या नियमानुसार १५ ते ३१ ऑक्टोबर या दरम्यान प्रकल्पात ९५ टक्के साठा ठेवता येतो. त्यापेक्षा अधिक साठा ठेवता येत नाही. २४ ऑगस्टला रात्री ९ वाजता प्रकल्पात ९५.३४ टक्के जलसाठा उपलब्ध झाल्याने तसेच प्रकल्पात पाण्याची आवक येत असल्याने प्रकल्पाचे दोन दरवाजे ३० सेंमीने वर उचलून ५०.१६ घनमीटर प्रतिसेकंद (५० हजार १६० लिटर प्रतिसेकंद) पाणी सोडण्यात आले. परंतु २५ ऑगस्टला सकाळी ६ वाजता प्रकल्पातील पाण्याची आवक मंदावली तसेच प्रकल्पाचा साठा ९४.२६ टक्क्यांवर आल्याने प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्यात आले. मात्र प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्यास प्रकल्पाचे दरवाजे कोणत्याही वेळी उघडले जाणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान जिल्ह्यातील दुसऱ्या मोठ्या वान प्रकल्पाचे दरवाजे २३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता दोन दरवाजे ३० सेंटीमीटरने उघडून ४२.१७ घनमीटर प्रतिसेकंद (४२ हजार १७० लिटर प्रतिसेकंद) पाण्याचा विसर्ग सुरू केला. मात्र पाण्याची आवक वाढल्याने सायंकाळी ५ वाजता प्रकल्पाचे आणखी दोन दरवाजे उघडून एकुण चार दरवाजातून ८२.३४ घनमीटर प्रतिसेकंद (८२ हजार ३४० लिटर प्रतिसेकंद) पाण्याचा विसर्ग सुरू केला. विशेष म्हणजे प्रकल्पात पाण्याची आवक कायम असल्याने हा विसर्ग सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *