विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजच्या वतीने विदर्भ चेंबरच्या सभागृहात झालेल्या प्लास्टिक बंदी बाबतच्या कार्यशाळेत व्यावसायिकांनी प्लास्टिक बंदी बाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली. शासनाने प्लास्टिक पिशव्यांसह सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली आहे. या प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मनपाने आतापर्यंत अनेक ठिकाणी दंडात्मक कारवाई केली आहे. नेमके कोणत्या प्लास्टिकवर बंदी आहे? याबाबत व्यावसायिकांमधील संभ्रम लक्षात घेऊन या प्लास्टिक बंदी बाबतची अधिक माहिती व्यावसायिकांना व्हावी, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ-उपप्रादेशिक कार्यालयाचे सब रिजनल ऑफिसर मनीष होळकर, फ्लोवेल इंडस्ट्रीजचे संदीप कोटक यांनी मार्गदर्शन केले. मनीष होळकर व संदीप कोटक यांनी नेमक्या कोणत्या प्रकारच्या प्लास्टिक वापरावर बंदी आहे, याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, पीपी बॅग्ज, किराणा बॅग्ज, बीओपीपी बॅग्ज हे पॅकेजिंग मटेरियल ५० मायक्रॉन व त्यापेक्षा जास्त असल्यास त्याला परवानगी आहे. तसेच व्यावसायिकांना काही संभ्रम अथवा माहिती हवी असल्यास त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. प्रमुख पाहुण्याचे स्वागत चेंबरचे माजी अध्यक्ष कमलेश वोरा, माजी सचिव श्रीकर सोमण यांनी केले. प्रास्ताविक विदर्भ चेंबरचे अध्यक्ष निकेष गुप्ता यांनी केले. सूत्रसंचालन मानद सचिव निरव वोरा यांनी केले, तर आभार सहसचिव निखिल अग्रवाल यांनी मानले. मनपा अधिकारी गैरहजर : या कार्यशाळेत प्लास्टिक बंदी बाबतची माहिती देण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही निमंत्रण दिले होते. व्यावसायिकांकडून प्लास्टिक बाबत दंड आकारणाऱ्या मनपाच्या अधिकाऱ्यांनी मात्र या कार्यशाळेला दांडी मारली.