दि अकोला अर्बन को-ऑप. बँकेची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गायवाडा शेतकरी भवन सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर होते. या वेळी बँकेचे संचालक तथा भागधारकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.
अध्यक्ष रामेश्वर फुंडकर मार्गदर्शन करताना म्हणाले, मध्य प्रदेशातील इंदूरच्या नागरी सहकारी बँकेचे अकोला अर्बन बँकेत विलीनीकरण झाले असून, आता इंदूर येथे ४ शाखा कार्यरत आहेत. ३१ मार्च अखेर बँकेचे वसूल भागभांडवल ६९.३० कोटी आहे. तर राखीव व इतर निधी १३८.७७ कोटी आहे. बँकेच्या ठेवींनी १६०५.६८ कोटींचा टप्पा गाठला असून ७९१.५९ कोटी कर्जाचे वाटप झाले आहे. बँकेला ९.९१ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. त्यामुळे २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा ५.५० टक्के दराने सभासदांना लाभांश वितरण करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर यांनी दिली.
कार्यक्रमात गतवर्षी दिवंगत झालेले नेते, विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्ती, बँकेचे सभासद, हितचिंतक, ठेवीदार, खातेदार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के यांनी मागील वर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रतिवृत्त सभेसमोर मांडले. त्याला सभेने बहुमताने मान्यता दिली. तर विषय सूचीनुसार विविध विषय उपाध्यक्ष शंतनू जोशी, सचिव हरीश लाखाणी, संचालक दीपक मायी, केदार खपली, राहुल राठी, मंजूषा सोनटक्के यांनी सभेसमोर मांडले. सर्व विषय व ठरावांना केवळ दोन सभासदांचा अपवाद वगळता बहुमताने सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. तर भागधारकांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत सविस्तर माहिती अध्यक्ष रामेश्वर फुंडकर यांनी दिली. सभेचे सूत्रसंचालन दीपक मायी यांनी केले, तर आभार विजय झुनझुनवाला यांनी मानले. सभेला संचालक रघुनाथ बढे, अमरिकसिंग वासरीकर, प्रमोद शिंदे, अजय गांधी, मोहन अभ्यंकर, डॉ. अलका तामणे, शाखा समितीचे सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के, हेमंत वऱ्हाडपांडे, सुखेन शाह, नागोराव माहोरे, विनोद अग्रवाल उपस्थित होते.